Mon, Apr 22, 2019 15:39होमपेज › Solapur › गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता

गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता

Published On: Jul 27 2018 11:47PM | Last Updated: Jul 27 2018 11:19PMपंढरपूर : प्रतिनिधी

गोपाळ काल्याबरोबरच आषाढी यात्रेची शुक्रवारी सांगता झाली असून गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात गोपाळ काला मोठ्या उत्साहात झाला. त्यानंतर सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने परतीसाठी देहूकडे प्रस्थान ठेवले आहे. तर, चंद्रग्रहण असल्यामुळे संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान शनिवारी होणार आहे. 

गोपाळ काला हा वारकरी परंपरेत महत्त्वाचा मानला जातो. या गोपाळ काल्यानंतरच पंढरीत जमलेल्या संतांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला निघतात. त्यानुसार यंदाच्या आषाढी एकादशीनंतर शुक्रवारी सकाळी ‘ज्ञानेश्‍वर माऊली तुकाराम’ या जयघोषात सर्व संतांच्या पालख्या गोपाळपूर येथे दाखल झाल्या.

 गोपाळ काला गोड झाला । 
गोपाळाने गोड केला ॥

या गजरात  वारकरी, भाविकांनी गोपाळकाल्याला उपस्थिती लावून उत्साहात साजरा केला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका, संत नामदेव, संत मुक्‍ताबाई, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ या मानाच्या पालख्यासह अन्य संतांच्या पालखीचे  गोपाळपुरात सकाळी आगमन झाले. पालख्यांच्या आगमनानंतर व पालखी विसावल्यानंतर  गोपाळपूर येथे पालख्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. गोपाळपूर ग्रामपंचायतीच्यावतीने पालख्यांची पूजा करण्यात आली. यानंतर भाविकांनी गोपाळ काल्यासाठी मंदीरात उपस्थिती लावली. 

गोपाळकाल्यासाठी आलेल्या भाविकांना ग्रामपंचायतीच्यावतीने अत्यावश्य सेवा सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. मंदिराला आकर्षक विद्युत राषणाई करण्यात आल्याने मंदिर विद्युत रोषणाईच्या प्रकाशात उजाळऊन निघाले होते. वाहतूक पोलीसांच्यावतीने पंढरपूर ते गोपाळपूर या रस्त्यावर वाहतूक बंद करण्यात आली होती. खास पालख्यांसाठी व भाविकांसाठी रस्ता खुला ठेवण्यात आला होता. गोपाळकाला साजरा झाल्यानंतर श्री विठ्ठलाच्या जयघोषात पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. पंढरीत आल्यानंतर श्री  विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी  पालख्या  विठ्ठल मंदिरात आल्या आणि विठ्ठलाचे दर्शन घेतले.

विठ्ठल दर्शनाची आस पूर्ण झाल्यानंतर तुझे दर्शन झाले आता । जातो माघारी पंढरी नाथा ॥  

यानुसार पालख्यांचा परतीचा प्रवास होणार आहे.

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सायंकाली साडे चार वाजल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघाला असून परतीच्या प्रवासातील पहिला मुक्काम वाखरी येथे होणार आहे. हजारो पंढरपूरकरांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास इसबावी येथपर्यंत सोबत पायी चालत जाऊन निरोप दिला. 

दरम्यान, शुक्रवारी चंद्रग्रहण असल्यामुळे संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघणार असल्याची माहिती पालखी सोहळ्याच्या सूत्रांकडून देण्यात आली.