Sat, Aug 24, 2019 23:18होमपेज › Solapur › संदीप पवार खूनप्रकरणी चौघे ताब्यात

संदीप पवार खूनप्रकरणी चौघे ताब्यात

Published On: Mar 19 2018 10:28PM | Last Updated: Mar 19 2018 10:17PMपंढरपूर : प्रतिनिधी

संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्‍या नगरसेवक संदीप पवार खूनप्रकरणी  ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने 4 आरोपींना पकडले आहे.  सोमवारी संध्याकाळी  गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अक्षय ऊर्फ बबलू सुरवसे यासह 4 जण ताब्यात घेतले गेले आहेत. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली 2 पिस्तुलेही आरोपींकडून जप्त करण्यात आली आहेत.

 अक्षय ऊर्फ बबलू धनंजय सुरवसे (वय 23, रा. कर्नाळ रोड, दत्तनगर, सांगली, मूळ रा. पंढरपूर), पुंडलिक वनारे, मनोज शिर्सेकर, भक्तराज धुमाळ( तिघे रा.पंढरपूर). ठाण्याच्या  खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 दरम्यान सोमवारी अतिशय तणावपूर्ण वातावरणात पवार यांच्यावर हजारो समर्थकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसर्‍या दिवशीही पंढरपूर शहर कडकडीत बंद होते. कुठेही कसलाही अनुचित प्रकार न घडता शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांचा रविवारी दुपारी 1 वाजता अज्ञात 6 ते 8 लोकांनी रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आणि सत्तूरने वार करून खून केला. या घटनेमुळे पंढरपूर शहर, तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री उशिरा संदीप पवार यांच्या आई श्रीमती सुरेखा पवार यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली असून त्यामध्ये पूर्व वैमनस्यातून संदीपचा खून करण्यात आल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी संशयित म्हणून संदीप अधटराव, विकी मोरे, अक्षय उर्फ बबलू सुरवसे यांची नावे सांगितली आहेत. अक्षय सुरवसे याने संदीपचा भाऊ प्रदीप उर्फ भैय्या पवार  याच्यासोबत किरकोळ कारणावरून मारामारी झाल्याचा राग मनात धरून 6 ते 7 इसमांना मदतीस घेऊन गोळीबार करून खून केल्याचे म्हटले आहे.

या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला असून पोलिसांची तीन पथके तपासासाठी तैनात करण्यात आलेली आहेत. पोलिसांनी घटनास्थळाच्या जवळपासच्या उपलब्ध सी.सी.टी.व्ही.चे फुटेज मिळवले असून त्याअनुषंगाने गुन्हेगारांची ओळख पटवण्याची, गुन्ह्यात वापरलेल्या दुचाक्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात एक बीगर नंबरची हिरो मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली असून ती 2015 साली सोलापुरातून चोरीस गेली असल्याचे निष्पन्न झालेले आहेत. खून केल्यानंतर आरोपी तोंडाला मास्क लावून पळून जात असल्याचे सी.सी.टी.व्ही. फूटेजमध्ये दिसून येत आहे. 

दरम्यान, सोलापूरच्या रुग्णालयात मयत जाहीर केल्यानंतर संदीप पवार यांचे पार्थीव सोमवारी पहाटे पंढरपुरात आणण्यात आले तर सकाळी 9 वाजता संदीप पवार यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून काढण्यात आली. या अंत्ययात्रेत 5 हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अंत्ययात्रा छत्रपती शिवाजी चौकात आली असता समर्थकांनी थांबवून जोपर्यंत आरोपींस अटक केली जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत असा पवित्रा घेतल्यामुळे तणावात भर पडली होती.  सहायक पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी संदीप पवार यांच्या कुटुंबीयांची समजूत काढली. पोलिस लवकरच आरोपींना ताब्यात घेतील अशी ग्वाही दिल्यामुळे अंत्ययात्रा पुढे मार्गस्थ करण्यात आली.  अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतरही संपूर्ण पंढरपूर शहरात जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात होता. शहरातील सर्व बाजारपेठा दुसर्‍या दिवशीही बंद होत्या. त्यामुळे पिण्यास पाणी मिळणेही दुरापास्त झाले होते. काही शाळा, महाविद्यालयेसुद्धा सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. सरकारी कार्यालये, बँकांचे कामकाज चालू असले तरी या कार्यालयांमध्येही दिवसभर शुकशूकाट पसरल्याचे दिवसभर दिसून येत होते. 

दरम्यान, संदीप पवार खून प्रकरणी  ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने 4 आरोपींना पकडले आहे.  सोमवारी संध्याकाळी  गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अक्षय उर्फ बबलू सुरवसे सह 4 जण ताब्यात घेतले गेले आहेत. त्यांच्याकडून शस्रसाठा जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली 2 पिस्तुलही आरोपींकडून जप्त करण्यात आले आहे.

Tags :Pandharpur, four arrested,sandeep pawar, murder case,