Fri, Jul 19, 2019 15:39होमपेज › Solapur › पालखी तळाकरिता भूसंपादन सुरू

पालखी तळाकरिता भूसंपादन सुरू

Published On: Jan 31 2018 2:07AM | Last Updated: Jan 30 2018 9:27PMपंढरपूर : प्रतिनिधी

  वाखरी, पिराचीकुरोली आणि भंडीशेगाव येथील पालखी तळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. वाखरी येथील सुमारे 100 एकर, तर भंडीशेगाव येथील सुमारे 25 एकर जागेच्या भूसंपादनासंदर्भात शेतकर्‍यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. यामुळे शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, भंडीशेगाव येथील शेतकर्‍यांनी भूसंपादनासाठी जमीन मोजणीकरिता आलेल्या शासकीय कर्मचार्‍यांना विरोध करून हाकलून लावले आहे. वाखरी येथील शेतकर्‍यांचाही तीव्र विरोध सुरू झालेला आहे. 

तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत पंढरपूर तालुक्यातील पिराचीकुरोली, वाखरी, भंडीशेगाव येथील भूसंपादनासाठीची  कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे. पालखी तळासाठी निश्‍चित करण्यात आलेल्या जमिनींची मोजणी करून त्यानंतर प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर शेतकर्‍यांना रितसर नोटिसा देऊन त्यांच्या हरकती मागवून नुकसान भरपाई दिल्यानंतर भूसंपादन सुरू केले जाणार आहे. भूसंपादनापोटी नेमकी किती नुकसान भरपाई दिली जाणार हे अद्यापही निश्‍चित नाही; मात्र सध्या कारवाई सुरू झालेली आहे. 

वाखरी येथे सर्वाधिक 50 खातेधारकांची सुमारे 100 एकर जमीन संपादन प्रस्तावित आहे. भंडीशेगाव येथे 28 खातेदारांची सुमारे 25 एकर जमीन संपादन प्रस्ताव आहे. भूसंपादनासाठी निश्‍चित केलेल्या जमिनीची मोजणी करून त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना पाठवण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात शेतकर्‍यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. भंडीशेगाव येथे जमीन मोजणीसाठी गेलेल्या भूमिअभिलेख, महसूलच्या कर्मचार्‍यांना शेतकर्‍यांनी विरोध करून हाकलून लावल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर वाखरी येथेही शेतकर्‍यांचा विरोध होऊ लागला असल्यामुळे येथील भूमापन प्रक्रिया होऊ शकलेली नाही. 

एकाबाजूला पंढरपूर विकास प्राधिकरणांतर्गत वाखरी गावच्या हद्दीत शेकडो एकर जमिनीवर विकासकामे प्रस्तावित आहेत. दुसर्‍या बाजूला पालखी तळ विकासांतर्गत पुन्हा वाखरी येथील 100 एकर जमीन संपादन केली जाण्याची शक्यता पाहून वाखरीतील शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे.