Sun, Nov 18, 2018 09:15होमपेज › Solapur › पंढरीतील शेतकर्‍यांचा बेदाणानिर्मितीवर भर

पंढरीतील शेतकर्‍यांचा बेदाणानिर्मितीवर भर

Published On: Mar 07 2018 11:20PM | Last Updated: Mar 07 2018 9:17PMपंढरपूर : प्रतिनिधी 

सध्या बाजारात द्राक्षेची मोठी आवक झाल्याने दर कमालीचे घसरले आहेत. चांगल्या दर्जेदार द्राक्षेला प्रतिकिलो 25 ते 30 रुपये दर मिळत आहे. त्यामूळे हजारो रुपये खर्च करुन पिकवलेल्या द्राक्षे विक्रीतून आर्थिक फायदा होत नसल्याने  तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षे विक्री करण्याऐवजी बेदाणानिर्मिती करण्यावर भर देत असल्याचे चित्र दिसून येते.

बाजारात मालाची आवक वाढली की त्याचे दर घसरतात. या नेहमीच्या वास्तवाला शेतकर्‍यांना सामोरे जावे लागते. सध्या तालुक्यात द्राक्षे उतरणीचा हंगाम सुरु आहे. त्यामूळे बाजारात द्राक्षेची मोठी आवक वाढली आहे. चांगल्या प्रतिची द्राक्षे 25 ते 30 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. द्राक्षेला बाजारात किमान 40 ते 50 रुपये प्रतिकिलो दर मिळाला तरच शेतकर्‍यांना द्राक्षे विक्री करणे आर्थिकदृष्ट्या परवडते. मात्र बाजारात द्राक्षेची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने आणखी दर घसरु लागले आहेत. त्यामुळे द्राक्षे उत्पादक शेतकरी चिंतेत असून बेदाणानिर्मितीकडे वळू लागले आहेत. पंढरपूर तालुक्यात कासेगाव, अनवली, खर्डी, खेडभाळवणी, करकंब, बोहाळी, आढीव, एकलासपूर, मेंढापूर, तनाळी, तावशी आदी भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. द्राक्षेचे उत्पादन मोठे असल्याने बाजारात मोठी आवक निर्माण होत आहे. 

बेदाण्याला बाजारात चांगली मागणी होत असून दरही चांगला मिळत आहे. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याला चांगले मार्केट आहे. दर पडले तर दरवाढ होईपर्यंत बेदाणा साठवण केंद्रात ठेवण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. कासेगाव परिसरात शितकरण (कोल्ड स्टोरेज)केंद्र उभारण्यात आली आहेत. याचा बेदाणा उत्पादक शेतकर्‍यांना चांगला फायदा होत असल्याने शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळत आहेत. शेतकर्‍यांनी बेदाणानिर्मितीकरीता शेड उभारलेले आहे. ज्यांना शेड नाही ते शेतकरी दुसर्‍या शेतकर्‍याच्या शेडवर बेदाणानिर्मितीसाठी द्राक्षे घेवून जात आहेत. 

ऊन, वारा व पाऊस याचा बेदाण्यावर परिणाम होऊ नये म्हणून बेदाणा शेडला शेडनेट त्याचबरोबर वॉटरप्रुफ कागदाचे आच्छादन वापरण्यात येत आहे. बेदाण्याला 110 ते 220 रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. त्यामूळे अधिकतर शेतकरी बेदाणानिर्मिती करण्यावर भर देत आहेत.