Tue, Mar 19, 2019 20:28होमपेज › Solapur › विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा विस्तार

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा विस्तार

Published On: Apr 05 2018 11:06PM | Last Updated: Apr 05 2018 11:05PMपंढरपूर : प्रतिनिधी

श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचा विस्तार करण्यात आला आहे. महाराज मंडळींना खूश करण्यासाठी राज्य सरकारने नव्याने 6 सदस्यांची नियुक्ती केली आहे. मंदिर समितीच्या कायद्यात केलेल्या सुधारणेनुसार सहअध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर वारकर्‍यांच्या मागणीनुसार वारकरी संप्रदायातील 6 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. 
यापूर्वी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच डॉ. दिनेश कदम, आ. राम कदम, शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, सचिन अधटराव, भास्करगिरी गरू किसनगिरी बाबा, गहिनीनाथ महाराज औसेकर आणि पदसिद्ध सदस्य म्हणून साधना भोसले यांची निवड करण्यात आलेली आहे. दरम्यान, या समितीला वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी कडाडून विरोध करीत आषाढी यात्रेच्या दरम्यान आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.  या महाराज मंडळींच्या मागणीचा विचार करून शासनाने मंदिरे समिती कायद्यात सुधारणा करून पंढरपूर मंदिरे (सुधारणा) अधिनियम, 2017 (2018 चा महा.2) याच्या कलम 2 च्या पोटकलम (1) च्या खंड (अ) द्वारे, सहअध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार समिती सदस्यांची एकूण संख्या बारावरून पंधरा करण्यात आली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून समितीच्या या सदस्यपदांच्या नियुक्तीची चर्चा सुरू होती. गुरुवारी नवीन सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली असून ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, माधवी निगाडे, अतुल भगरे, शिवाजीराव मोरे, प्रकाश महाराज जवंजाळ, आ. सुजितसिंह ठाकूर यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीच्या पुनर्रचनेनुसार आता सदस्य संख्या 15 झाली असून  अध्यक्ष आणि सहअध्यक्ष अशी दोन सत्तास्थाने निर्माण झालेली आहेत. तसेच परंपरा मानणार्‍या महाराज मंडळींचाही भरणा या समितीमध्ये करण्यात आल्यामुळे यापुढे काम करताना समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.