Sat, Jul 11, 2020 23:23होमपेज › Solapur › पंढरपुरातील विकासकामांवर कार्यकारी समितीचे लक्ष राहणार

पंढरपुरातील विकासकामांवर कार्यकारी समितीचे लक्ष राहणार

Published On: Dec 21 2017 1:50AM | Last Updated: Dec 20 2017 10:51PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

शहरात सुरू असलेली तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामास प्राधान्य देण्यात येत असून, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विकासकामे करताना अडथळा ठरणारे विजेचे पोल, जुनी गटारे हटविण्यात येणार आहेत.  सुरू असलेल्या कामांची पाहणी कार्यकारी समिती करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले बुधवारी पंढरपूर येथे आले होते. चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, मंदिर परिसर आदी कामांची पाहणी केल्यानंतर त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, शहरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत  101 कामे सुरू आहेत. यापैकी 46 कामे पुर्ण झाली आहेत. तर 11 कामे विकास आराखड्यातून वगळण्यात आली आहेत. 65 एकर, चंद्रभागा घाट, दर्शन रांग आदी ठिकाणी करण्यात येणार्‍या कामांना गती देण्यात येत आहे. तर शहरातील सांगोला चौक येथील अतिक्रमणे व ट्रॅफिक कमी करण्यासाठी रस्ता रुंदीकरण करण्याचे काम नगरपालिका 7 दिवसात हाती घेईल.चंद्रभागा नदीकाठी 2300 मीटरचा घाट  बांधला जाणार आहे. पंढरपूर विकास प्राधिकरणाबाबत आलेल्या हरकती नगररचना विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत. या खात्याकडून महत्वाच्या सूचना व बदल अपेक्षित आहेत. कमिटीच्या सुचनेनुसार बदल केले जातील. विनाकारण लोकांच्या जमिनी संपादित केल्या जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगीतले.  यावेळी प्रांताधिकारी विजयकुमार देशमुख, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपविभागीय पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, तहसीलदार मधूसूदन बर्गे आदी उपस्थित होते.