Mon, Jun 17, 2019 04:11होमपेज › Solapur › ‘दादा, तुमचा पंढरपूरवर भरोसा नाय काय? ’

‘दादा, तुमचा पंढरपूरवर भरोसा नाय काय? ’

Published On: Feb 09 2018 2:03AM | Last Updated: Feb 08 2018 9:46PMपंढरपूर : नवनाथ पोरे

2019 सालची पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहात असलेले संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांचे सुमारे 45 टक्के मतदार असलेल्या पंढरपूर शहर आणि तालुक्यातील 22 गावांकडे साफ दुर्लक्ष आहे. उठता- बसता भूमिपुत्राचा ठेका धरून मंगळवेढ्याच्या भूमीतच रममाण असलेल्या आवताडे यांचा   ‘पंढरपूरवर भरोसा नाय काय’, असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे. 

2019 च्या लोकसभा निवडणूक कामाला राजकीय पक्ष लागले असले तरी गाव पातळीवरील कार्यकर्ते, नेते यांचे मात्र पूर्ण 5 वर्षे केवळ विधानसभा निवडणुकीवर लक्ष असते. एक निवडणूक झाली की कार्यकर्ते पुढच्या विधानसभेची चर्चा सुरू करतात आणि नेतेमंडळीसुद्धा पुढील निवडणुकीच्या तयारीस लागतात. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणार्‍या नेत्यांसाठी पाचही वर्षे युद्धाचा प्रसंग असतो. या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर विधानसभेच्या निवडणुकीचा विचार केला असता विद्यमान आमदार भारत भालके 24 तास निवडणूक मोडवर असतात. त्यांचे सगळे लक्ष पंढरपूरसह मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गाव आणि कार्यकर्त्यांवर असते. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आ. प्रशांत परिचारक यांचीही सतत निवडणूक मोहीम सुरू असते. सतत कार्यमग्न आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात असणार्‍या या दोन्हीही तयारीच्या नेत्यांना चितपट करून विधानसभेत जाण्याची स्वप्ने पाहणारे समाधान आवताडे मात्र केवळ मंगळवेढा तालुक्यातच रममाण असतात. मंगळवेढा तालुक्यात ते नेहमी भूमिपुत्र असल्याचा मुद्दा तापवत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. मंगळवेढा शहर आणि तालुक्यात असलेल्या पूर्ण 85 गावांतही त्यांचे पूर्ण वर्चस्व आहे अशी परिस्थिती नाही. मागील विधानसभा निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यातच अवताडे यांना अपेक्षित मतदान झाले नाही म्हणून तिसर्‍या क्रमांकावर राहावे लागले. तरीही आवताडे मंगळवेढा तालुक्यातच अडकून पडलेले दिसून येतात. या विधानसभा मतदारसंघात पंढरपूर शहर आणि 22 गावांचा समावेश असून या तालुक्यात एकूण मतदानाच्या सुमारे 45 टक्के मतदान असूनही आवताडे पंढरपूरकडे दुर्लक्ष करीत आहेत.  गेल्या साडेतीन वर्षांत आवताडे यांनी पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासाठी काहीच केले नाही. जे काही मोजके कार्यकर्ते आहेत त्यांनाही त्यांनी प्रोत्साहन दिल्याचे दिसून येत नाही. पंढरपूरच्या प्रश्‍नांवर त्यांनी कधीही आवाज उठवला नाही किंबहुना त्यांना पंढरपूरच्या प्रश्‍नांची जाणीवही नसावी एवढी त्यांची अलिप्तता दिसून येते.   

विधानसभा निवडणूक आता  दीड वर्षावर आलेली असताना अजूनही त्यांनी पंढरपूर शहरासह तालुक्यातील 22 गावांवर लक्ष दिलेले नाही. त्यामुळे  ‘दादा, तुमचा पंढरपूरवर भरोसा नाय काय’, असा सवाल उपस्थित केला जात आहे.