Fri, Apr 19, 2019 12:42होमपेज › Solapur › पंढरीच्या गुन्हेगारीला सावकारीचाही आधार

पंढरीच्या गुन्हेगारीला सावकारीचाही आधार

Published On: Mar 21 2018 11:01PM | Last Updated: Mar 21 2018 11:01PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर शहर आणि ग्रामीण खासगी सावकारीने हैदोस घातला असून खासगी सावकारीच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात पोलिसांकडूनही बघ्याची भूमिका घेतली जाते. खासगी सावकारांशी पोलिसांची हातमिळवणी असल्याचे पाहिल्यानंतर सर्वसामान्य नागरिक पोलिसांकडे विश्‍वास ठेऊन जात नाहीत तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार झेलत आहेत.

नगरसेवक संदीप पवार यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर पंढरपूर शहरातील व्हाईट कॉलर गुन्हेगारीची चर्चा जोरात सुरू झालेली आहे. या गुन्हेगारीला बळ देणार्‍या अनेक घटकांपैकी खासगी सावकारीसुद्धा एक महत्त्वाचे कारण असल्याचे मानले जात आहे. खासगी सावकारी, भूखंड बळकावणे, वादातील जागा सोडवून देणे-घेणे अशा प्रकारांतून शहरातील गुन्हेगारी वाढू लागली आहे. 

श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी दररोज येणार्‍या भाविकांच्या माध्यमातून पंढरीनगरीत वर्षाला करोडो रुपयांची उलाढाल होते. यामुळेच पंढरीतील सावकारकी फोफावली असल्याचे चित्र दिसत आहे. कोणताही व्यवसाय न करता सावकारकीमध्ये थोड्याच दिवसात चांगला पैसा मिळत असल्याने या अध्यात्मिक पंढरीला छुप्या खासगी सावकारांचा पाश आवळला जातोय. या समस्येकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

सध्या शहर व ग्रामीण भागात खासगी सावकारीचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले असून कोणत्याही प्रकारची नोंदणी आणि परवानगी नसलेल्या सावकारांची संख्या दररोज वाढत आहे. हे सावकार मनमानी व्याज लावून अडल्या, नडलेल्या सर्वसामान्यांची पिळवणूक करीत असतात. या बेकायदा व्यवहारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. परिस्थितीने गांजलेल्या गरजूंना प्रति शेकडा, प्रति महिना दहा ते पंधरा रुपये टक्के दराने कर्ज दिले जात आहे. हवे तेव्हा असे कर्ज सहज मिळत असते आणि त्यासाठी कागदपत्रांची  कसलीच आवश्यकता नसते. त्यामुळे गरजू अशा सावकारांच्या कचाट्यात अलगद सापडले जात आहेत. बेकायदेशीर खासगी सावकारांचे पैसे वेळेत परत न केले तर चक्रवाढ व्याजाने पैसे वाढत जातात. वसुली करताना धमकी, मारहाण, घरातील वस्तू, टीव्ही, फ्रीज, दागिने, फर्निचर उचलून नेणे, व्याजाच्या पैशांसाठी डांबून ठेवणे, बँकेचे कोरे चेक, स्टॅम्पवर मजकूर लिहून त्यावर सही करण्यास भाग पाडणे अशा खासगी सावकारांच्या दहशतीला, लागेबांधे आणि स्वतःच्या बदनामीच्या भीतीने अनेकजण हे प्रकार निमूटपणे सहन करीत असल्याचे चित्र समोर येत आहे.

 यामध्ये काही दादामंडळी दारू, गांजा, जुगार, मटका यात दररोज लाखो रुपये कमावून ते पैसे सावकारीत गुंतवत आहेत. आठवडा बाजाराचे हप्ते, भिशीचे हाप्ते, कर्जावरील व्याज हे वेळेवर दिले नाही तर खासगी सावकार कर्जाचे व्याज हे प्रमाणापेक्षा जास्त घेतो. हप्ताच्या कर्जाच्या रकमेपेक्षा व्याजाची रक्कम ही कधी कधी दुप्पट असते. ठरलेल्या वेळेत कर्जाचा हप्ता भरावा लागतो. हप्ता भरण्यास उशीर झाला तर सावकार दंड आकारतो. अशिक्षित आणि गरीब लोकांना सावकारी व्यक्ती पाहिजे तेवढी रक्कम देऊन कोर्‍या स्टँप पेपरवर सही घेतात. कर्ज फेडले तरीही खोटी नोंद करून व्याज वाढवतात आणि फसवतात. कर्जाची परतफेड झाली नाही तर धमक्या देतात, नाहीतर तारण किंवा गहाण ठेवलेली वस्तू, घर, जमीन, दुचाकी वाहन, चारचाकी वाहन हडपण्याचा प्रयत्न करतात. असे प्रकार सर्रास सुरू असून दांडगाईने सुरू असलेल्या या प्रकारांबाबत प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाली आहे.