होमपेज › Solapur › आरोपींना ताब्यात द्या; पंढरपूर पोलिसांचे ठाणे पोलिसांना पत्र

आरोपींना ताब्यात द्या; पंढरपूर पोलिसांचे ठाणे पोलिसांना पत्र

Published On: Mar 21 2018 11:01PM | Last Updated: Mar 21 2018 10:47PMपंढरपूर : प्रतिनिधी

येथील नगरसेवक संदीप पवार यांच्या खून प्रकरणातील मुख्य 4 आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पंढरपूर पोलिसांनी ठाणे पोलिसांबरोबर पत्रव्यवहार केला असून लवकरच आरोपी पंढरपूर पोलिसांच्या ताब्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणातील  टोळीचा मुख्य सूत्रधार अक्षय ऊर्फ बबलू धनंजय सुरवसे (रा. सांगली), पुंडलिक शंकर वनारे, मनोज शंकर शिरशीकर आणि भक्तराज ज्ञानेश्‍वर धुमाळ (तिघे रा. पंढरपूर) या चौघांना  ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने पकडले आहे. सध्या हे चारही आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या खून प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी या आरोपींना पंढरपूर पोलिस ताब्यात घेणार आहेत. याकरिता पंढरपूर पोलिस ठाणे पोलिसांना ट्रान्स्परंट वॉरंट देणार असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिली.

अफवा पसरविणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करावी : पवार

रविवारी माझा मुलगा संदीप दिलीप पवार याचा खून करण्यात आला. या घटनेनंतर मंगळवारी (दि.20) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास काही समाजविघातक मंडळींनी दगडफेक केली, खून झाला अशी अफवा पसरविली. या भीतीने संपूर्ण पंढरपुरात त्वरित लोकांनी आपली दुकाने, व्यवहार बंद केले. यामुळे पंढरपुरातील सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन लागला आहे. याची आम्हाला जाणीव आहे. मात्र अशा प्रकारची घटना करणे, या घटनेला आमच्या कुटुंबीयांना जबाबदार धरले जात आहे. तरी अफवा पसरवण्याशी आमचा काहीही संबंध नसून असे कृत्य करणार्‍या समाज विघातक मंडळींविरुद्ध पोलीसांनी त्वरित कारवाई करावी. तसेच व्यापारी बंधुंनीही आपले व्यवहार निर्भयपणे करावेेत. अशी आमच्या कुटुंबातर्फे विनंती आहे. संदीपच्या खुनाच्या निषेधार्थ तमाम पंढरपूरकरांनी आपले  दैनंदिन  व्यवहार बंद ठेवून आमच्या दु:खात सामील झाले. त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत.असे नगरसेविका सुरेखा दिलीप पवार  यांनी म्हटले आहे.