होमपेज › Solapur › दगडफेकीच्या अफवेनंतर पंढरपूर बंद

दगडफेकीच्या अफवेनंतर पंढरपूर बंद

Published On: Mar 20 2018 8:55PM | Last Updated: Mar 20 2018 8:55PMपंढरपूर : प्रतिनिधी

दोन दिवसांपूर्वी झालेल्या नगरसेवक संदिप पवार याच्या हत्येनंतर शहरात निर्माण झालेल्या तणावाचा गैरफायदा उठवत मंगळवारी रात्री समाजकंटकांनी शहरात दगडफेक झाल्याची अफवा पसरवली. त्यानंतर क्षणात शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद केली गेली. त्यामुळे शहरात पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी ही अफवा असल्याचे जाहीर केले.

आज, मंगळवारी पंढरपूरचा आठवडा बाजार असतो. शहर तसेच परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ बाजारासाठी पंढरपुरात येत असतात. दोन दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचे सावट या बाजारावर दिसून येत होते. त्यातच सायंकाळी आठच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या टवाळखोरांनी जुनीपेठ परिसरात दगडफेक सुरू असल्याची सांगत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. क्षणात काय होत आहे हे समजण्यापूर्वीच भीतीमुळे सर्व दुकाने बंद करण्यात आली तर बाजारसाठी आलेल्यांची एकच धावपळ उडाली. या अफवेची बातमी पोलिसांना समजताच तातडीने पोलिसांनी शहरात फिरून अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगत दुकाने उघडण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. 

दरम्यान, या अफवेनंतर शहरात एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी सतर्क राहून अशा टवाळखोरांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

 

tags : solapur, solapur news, pandharpur closed band, rumors stone pelting, tension in pandharpur