Thu, Apr 25, 2019 12:22होमपेज › Solapur › चंद्रभागा नदीपात्रातील कचरा उचलला

चंद्रभागा नदीपात्रातील कचरा उचलला

Published On: May 20 2018 10:25PM | Last Updated: May 20 2018 9:12PMपंढरपूर : प्रतिनिधी

अपुरे पाणी असल्यामुळे व नदीपात्रात शेवाळ साठल्यामुळे पाण्याला दुर्गंधी आली असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला होता. याकडे दै. ‘पुढारी’ने लक्ष्य वेधताच मंदिर समितीच्या सफाई ठेकेदाराने संपूर्ण नदीपात्राची स्वच्छता करून घेतली आहे. त्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.

अधिकमासानिमित्त पंढरीत मोठ्या संख्येने भाविक येत आहेत.  चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांची  गर्दी होत असली तरी शेवाळयुक्त पाण्यात भाविकांना स्नान करावे लागत होते. तसेच नदीपात्रात भाविकांनी टाकून दिलेले कपडे, प्रासादिक वस्तुंचाही मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता.  या विषयाकडे दै. ‘पुढारी’ने  लक्ष्य वेधले होते. त्यानंतर मंदिर समितीच्यावतीने नियुक्त करण्यात आलेल्या सफाई ठेकेदाराकडून नदीपात्रातील स्वच्छता करण्यात येत आहे.

दोन दिवसांपासून चंद्रभागा नदीपात्राची स्वच्छता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कर्मचार्‍यांकडून नदीपात्रातील फाटकी कपडे, चप्पला, निर्माल्य, प्रासादिक वस्तूच्या कचर्‍याचे ढिगारे, हार, नारळ फळांच्या साली उचलण्यात येत आहेत. गोळा केलेला कचरा डंपिंग ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्राबाहेर नेला जात आहे.  मंदिर समितीच्यावतीने दैनंदिन या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार असल्याने किमान अधिकमासात तरी नदीपात्र स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. नदीपात्रा असलेल्या गुडघाभर पाण्यात स्नान करताना पाणी ढवळले जात आहे. 

यामुळे पाण्यात असलेले शेवाळ स्नान करताना भाविकांच्या अंगावर येत आहे. मंदिर समितीच्यावतीने स्वच्छता कामासाठी खासगी कंपनीला ठेका दिला असून या कंपनीच्यावतीने महिला व पुरुष कर्मचार्‍यांद्वारे नदीपात्रातील स्वच्छता करण्याचे काम होती घेण्यात आल्याचे दिसत आहे.  या स्वच्छतेमुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

लवकरच उजनीतून चंद्रभागेला पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे त्यानंतर संपूर्ण चंद्रभागेचा पात्र स्वच्छ होईल आणि भाविकांना चांगले शुद्ध पाणी स्नानाकरिता उपलब्ध होईल असे दिसत आहे.