Mon, Mar 25, 2019 09:10होमपेज › Solapur › कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी केंद्राने निधी द्यावा : सौ. गोडसे

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी केंद्राने निधी द्यावा : सौ. गोडसे

Published On: Dec 25 2017 1:17AM | Last Updated: Dec 24 2017 8:54PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

सोलापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार्‍या कृष्णा-भीमा स्थीरीकरण योजनेसाठी केंद्र सरकारने नद्या जोड प्रकल्पांतर्गत निधी द्यावा अशी मागणी करीत या योजनेसाठी जनआंदोलन उभे करणार असल्याची माहिती कुरूल जि.प.गटाच्या सदस्या सौ. शैला गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सौ. शैला गोडसे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचा एकूण आराखडा सादर केला. तसेच या योजनेची उपयुक्तता स्पष्ट केली. यावेळी पुढे बोलताना सौ. गोडसे म्हणाल्या की, सध्या ऊजनी धरणातील   उपलब्ध पाण्याचे नियोजन पूर्ण झालेले आहे. नियोजीत प्रकल्प आणि योजना पूर्ण झाल्यानंतर उजनी धरणातील आहे ते पाणी पुरणार नाही. त्यामुळे पुढच्या पिढीसाठी तरी उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. यापुर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी कुंभी, कासारी, वारणा, कृष्णा नद्यांचे अतिरिक्त पाणी प्रवाही पद्धतीने भीमा नदीत आणण्याची संकल्पना मांडली होती. 2004 साली कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेला प्रकल्पीय मान्यताही मिळाली होती.

 त्यावेळी 4 हजार 900 रुपये एवढा या योजनेचा खर्च होता. याच योजनेतील उपलब्ध 21 टी.एम.सी. पाणी मराठवाड्यास देण्याचीही तरतूद करण्यात आली. विशेष म्हणजे या  21 टी.एम.सी. पाण्यासाठी उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील कालव्याची कामे सुरू आहेत. नीरा-भीमा जोड कालव्याचे आणि बोगद्याचे काम ही सुरू आहे. मात्र कृष्णा-भीमा जोड कालव्याचे काम सुरूही झालेले नाही.  प्रकल्पीय मंजुरीनंतर या योजनेवर काहीच काम झालेले नाही. 

खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. सध्याही त्यांचा दिल्लीत योजनेसाठी पाठपुरावा सुरूच आहे. मात्र योजना मार्गी लागत नाही. दरम्यान योजना रखडल्यामुळे आज योजनेची किंमत सुमारे 25 हजार कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. मात्र, 115 टी.एम.सी. पाणी कृष्णेच्या खोर्‍यातून भीमेच्या खोर्‍यात आणल्यास सुमारे 6 लाख हेक्टर जमीनीला याचा लाभ होणार आहे.

 तसेच महाराष्ट्राचे अतिरिक्त आणि वाहून जाणारे पाणी बचत होणार आहे. हे लक्षात घेता कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना पूर्ण होणे गरजेचे आहे. त्याकरिता जनतेचा रेटा अवश्यक आहे असे सांगून सौ. गोडसे पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकारने खानदेशातील तापी आणि पिंंजळा नदी जोडण्यासाठी 55 हजार कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्याच धरतीवर कृष्णा-भीमा नदी जोड प्रकल्प म्हणून या योजनेला केंद्र सरकारने निधी द्यावा. दरवर्षी 2 हजार 500 कोटी रुपये निधी जरी दिला तरी 10 वर्षात ही योजना पूर्ण होईल. मात्र त्याकरिता राज्य सरकारनेही केंद्राकडे प्रस्ताव पाठवणे गरजेचे आहे. 
याकरिता आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पत्र लिहीले असून प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करण्याबरोबरच जनतेमध्ये जाऊन या योजनेचा प्रचार, प्रसार करून  लवकरच सोलापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात जनआंदोलन उभा करणार आहोत, सर्वच राजकीय पक्षांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनाही भेटून या योजनेसाठी सर्वसंमती मिळावी आणि सर्व पक्षीय एकजूट निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचाही निर्धार सौ. गोडसे यांनी यावेळी व्यक्त केला.