Wed, Nov 14, 2018 18:45होमपेज › Solapur › आषाढी यात्रेची सांगता

आषाढी यात्रेची सांगता

Published On: Jul 28 2018 11:00PM | Last Updated: Jul 28 2018 9:58PMपंढरपूर : प्रतिनिधी

लाह्यासह गुलाल व बुक्याची उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाव्दार काला आज शनिवारी (28 जुलै) उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर खर्‍या अर्थाने आषाढी यात्रेची सांगता झाली. यासाठी हजारो भाविकांनी काल्याचा वाडा व मंदिर सभामंडपात गर्दी केली होती.

येथील हरिदास घराण्यात मागील दहा पिढ्यापासून हा उत्सव साजरा करण्यात येतो. जवळपास चारशे वर्षा पूर्वी त्यांच्या घराण्यात पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने चरण पादुका दिल्या असल्याची अख्यायिका सांगितली जाते. या पादुका डो3यावर धारण करून हा सोहळा साजरा करण्याची वेगळी परंपरा आहे. शनिवारी या परंपरे नुसार दुपारी बारा वाजता काल्याचे मानकरी असलेल्या मदन महाराज हरिदास यांच्या डो3यावर पागोट्याने या पादुका बांधण्यात आल्या. यानंतर श्री विठ्ठल मंदिरातील सभामंडप येथे पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या नंतर दही व लाह्याने भरलेली हांडी फोडण्यात आली. या नंतर हा सोहळा महाव्दार घाटावरून चंद्रभागा नदी, कुंभार घाट मार्गे माहेश्‍वरी धर्मशाळा येथून हरिदास वेस येथील काल्याच्या वाड्यात विसावला. मार्गात जागोजागी लाह्या व गुलाल, बु3याची उधळण करण्यात येत होती. यावेळी दर्शनास येणार्‍या हजारो भाविकांना दही, दूध व लाह्या पासून बनविलेल्या काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. सदर सोहळ्यामध्ये संत नामदेवांचे वंशज असणार्‍या नामदास महाराज यांना मोठा मान असून त्यांची दिंडी काल्याच्या पुढे असते. 

काल्याचा इतिहास या उत्सवा बाबत माहिती देताना बाळशास्त्री हरिदास यांनी सांगितले की, देवाचे सेवाधारी असणार्‍या हरिदास घराण्यात जवळपास 391 वर्षापूर्वी पासून हा उत्सव साजरा होत आहे. आमच्या घराण्यात पांडुरंग महाराज हे संत होऊन गेले. बालपणापासून विठ्ठल भक्त असणार्‍या महाराजांना केवळ देवाच्या दर्शनाचा ध्यास होता. यासाठी ते त्रिकाल स्नान (सकाळी, दुपारी व सायंकाळी) अर्थात दिवसातून तीन वेळा चंद्रभागेचे स्नान करून विठ्ठल मंदिरात सेवा करीत असत. वयाच्या 70 व्या वर्षी पांडुरंग महाराज दुपारी बारा वाजता चंद्रभागा स्नानास जात असताना कडक उन्हाळा असल्यामुळे वाळवंटात चक्कर येऊन बेशुध्द पडले. यावेळी प्रत्यक्ष विठ्ठलाने त्यांना दृष्टांत देऊन आपल्या चरण पादुका दिल्या.