Thu, Mar 21, 2019 23:20
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › गोपाळ काल्याने आज आषाढीची सांगता

गोपाळ काल्याने आज आषाढीची सांगता

Published On: Jul 26 2018 11:04PM | Last Updated: Jul 26 2018 10:48PMपंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी यात्रेच्या सोहळ्याची सांगता शुक्रवारी (दि. 27) गोपाळपूर येथील गोपाळ काल्याने होणार आहे. त्यानंतर संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सायंकाळी 5 वाजता परतीच्या प्रवासाला निघणार असून संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा सोहळा मात्र रविवारी परतीसाठी प्रस्थान ठेवणार आहे. 

यावर्षीच्या आषाढी यात्रेची सांगता परंपरेनुसार गोपाळ काल्याने होणार आहे. शुक्रवारी सकाळी गोपाळपूर येथे गोपाळकृष्ण मंदिरात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गोपाळ काला होणार आहे. त्याकरिता मानाच्या संतांच्या सर्व पालख्या गोपाळपूर येथे जात असतात. गोपाळ काल्यानंतर सर्व संतांच्या पालख्या, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, असे म्हणून आपापल्या गावाकडे परतीच्या मार्गाला लागत असतात. 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गोपाळ काला झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पंढरपुरातून देहूसाठी प्रस्थान ठेवणार असून परतीच्या प्रवासातील पहिला मुक्काम वाखरी येथे होणार आहे. तर संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघणार आहे. आणि या पालखी सोहळ्याचाही पहिला मुक्काम वाखरी येथेच असणार आहे. इतर संतांच्या पालख्या शुक्रवारीच परतीच्या प्रवासाला लागणार आहेत. त्यामुळे भाविकांना आता परतीचे वेध लागले असून पंढरपूरकरही संतांना निरोप देणार आहेत.