Thu, Jan 24, 2019 16:53होमपेज › Solapur › पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त; पतीस ५ वर्षे सक्तमजुरी

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त; पतीस ५ वर्षे सक्तमजुरी

Published On: Feb 27 2018 8:20AM | Last Updated: Feb 26 2018 10:22PM पंढरपूर : प्रतिनिधी 

पती, सासू, सासरा व दीर  यांनी संगनमत करून निवेदिता  समाधान शिंदे हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ केला. या छळास कंटाळून तिने आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पती समाधान कृष्णा शिंदे याला दोषी धरून 5 वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रु. दंडाची शिक्षा येथील सहायक जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. के. शेख यांनी सुनावली. तर सासू, सासरा व दीर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

गौडवाडी (ता. सांगोला)  येथील आरोपी समाधान कृष्णा शिंदे याची पत्नी निवेदिता समाधान शिंदे हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन आरोपी पती समाधान शिंदे, दीर जगन्नाथ शिंदे, सासरा कृष्णा शिंदे व सासू मालन शिंदे हे संगनमत करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन  मारहाण करत असे. या त्रासास कंटाळून तिने दि. 6 मार्च 2014  रोजी राहत्या घरी पेटवून घेऊन आत्महत्या केली.  या आत्महत्या प्रकरणी पती, सासरा, सासू व दीर यांच्या विरुद्ध सांगोला पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.

 त्यानुसार या प्रकरणी आरोपीविरुद्ध सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर करचे यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात कामकाज चालले. सरकारतर्फे एकूण 5 साक्षीदार यांची साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये फिर्यादी रवींद्र माने, डॉ. सिध्दार्थ सावडीकर व तपास अधिकारी ज्ञानेश्‍वर करचे साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

 त्यानुसार झालेल्या एकंदरीत पुरावा व साक्ष याचे अवलोकन करून पंढरपूर येथील सहायक जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. के. शेख यांनी आरोपी समाधान कृष्णा शिंदे यास भादवि कलम 306प्रमाणे दोषी धरून 5 वर्षे सक्तमजुरी व  10 हजार दंड तसेच भादवि कलम 498 (अ) प्रमाणे दोषी धरून त्याकरीता 1 वर्ष सक्तमजुरी व 10 हजार  अशी शिक्षा सुनावली आहे. तर   सासू, सासरा व दीर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. सारंग वांगीकर यांनी कामकाज चालविले. कोर्ट पैरवी म्हणून पो. हे. कॉ. रवींद्र बनकर यांनी काम पाहिले.