Sun, Nov 18, 2018 07:05होमपेज › Solapur › भाविकांना केंद्रबिंदू मानून आषाढी पार पाडावी : ना. विजयकुमार देशमुख

भाविकांना केंद्रबिंदू मानून आषाढी पार पाडावी : ना. विजयकुमार देशमुख

Published On: Jun 20 2018 1:17AM | Last Updated: Jun 19 2018 10:40PMपंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी यात्रा सोहळा व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून भाविकांना केंद्रबिंदू मानून यात्रा पार पाडण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली.

येथील संत तुकाराम भवन येथे आषाढी यात्रा नियोजन पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ना. देशमुख बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आ. बबनदादा शिंदे, आ. भारत भालके, आ. प्रशांत परिचारक, जि.प. अध्यक्ष संजय शिंदे,  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, सीईओ डॉ. राजेंद्र भारूड, सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, प्रांताधिकारी सचिन ढोले, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह पालखी प्रमुख, स्थानिक व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, राज्यभरातून येणार्‍या लाखो भाविकांना येथे पिण्याचे पाणी, वीज, औषधोपचार या अत्यावश्यक सेवासुविधा मिळाल्या पाहिजेत. पालखी प्रमुख व नागरिकांनी केलेल्या सुचनांची दखल घेवून कार्यवाही करीत वारकर्‍यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  यात कामचुकारपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी प्रमुख व नागरिकांनी उपस्थित केलेल्या सूचना व प्रश्‍नांना उत्तरे देत जिल्हा प्रासनाने पिण्याचे पाणी, शहरातील रस्ते, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, अतिक्रमणे याबद्दल नियोजन केल्याचे सांगीतले. तसेच शहरातील रस्त्यांची कामे जशी आहेत. त्या अवस्थेत ठेवण्यात येणार असून प्रदक्षिणा मार्ग, पत्राशेड येथे कचखडी न टाकता भाविकांसाठी रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. दि. 17 जुलै पासून नदीत स्नानासाठी पाणी सोडण्यात येणार असून यात्रा काळात दिवसातून दोन वेळाच शहराला पिण्याचा पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगीतले.

आ. भारत भालके म्हणाले की, यात्रा काळात स्थानिक विक्रेते, व्यापारी यांच्यावर अन्याय न करता त्यांना ओळखपत्र द्यावे. पालखी मार्गावरील गावांना यात्रा निधी 15 दिवस अगोदर द्या. निधी लवकर दिला तर भाविकांसाठी अत्यावश्यक सुविधा ग्रामपंचायतीकडून देण्यास मदत होईल. याकरिता हवे तर यात्रा अनुदान 5 वरून 10 कोटी करण्याची मागणी केली.

दिंडी प्रमुख व स्थानिक नागरिक यांची स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना दिंडी प्रमुखांनी उपस्थित केल्यावर काही वेळा स्थानिक नागरिक व दिंडी प्रमुख यांच्यात गोंधळ सुरू झाला. मात्र पालकमंत्र्यांनी वेगवेगळ्या बैठका न घेता एकत्रितपणे सूचना व प्रश्‍न उपस्थित करत यात्रा नियोजन करण्यात येईल असे सांगितल्याने वादावर पडदा पडला.