Mon, Aug 19, 2019 18:08होमपेज › Solapur › पंढरीत तापमान 41 अंशांवर

पंढरीत तापमान 41 अंशांवर

Published On: May 28 2018 1:31AM | Last Updated: May 27 2018 10:08PMपंढरपूर : प्रतिनिधी

अधिक मास, त्यातच रविवारची सुट्टी असल्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत आलेल्या भाविकांना उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागला. पंढरीत रविवारी तापमान 41 अंशांवर गेल्यामुळे दर्शन रांगेत उभा असलेले भाविक गुदमरून गेले. 5 ते 6 भाविकांना उष्माघाताचा त्रास झाला असून त्यापैकी 2 जणांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून नंतर सोडून देण्यात आले. 

सध्या अधिकमास सुरू असून, रविवार असल्यामुळे पंढरीत येणार्‍या भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. सुमारे 1 लाखापेक्षाही जास्त भाविकांनी पंढरीत गर्दी केली होती. या गर्दीमुळे चंद्रभागा नदीचे वाळवंट फुलून गेले, तशीच दर्शन रांगही भुतेश्‍वर मंदिरापर्यंत लांब गेली होती. उन्हाचा प्रचंड कडाका वाढल्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागला. रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून तापमान चाळीस अंशांवर गेले, तर दुपारी 2 वाजता 41 अंशाची पातळी पार केली होती. त्यामुळे दर्शन रांगेत उभा असलेले भाविक उन्हाच्या तडाख्यामुळे त्रस्त झाले. त्याचबरोबर अपेक्षेपेक्षा जास्त भाविक रांगेत उभा असल्यामुळे  मंदिर समितीच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले.

संत ज्ञानेश्‍वर दर्शन मंडपात आल्यानंतर उकाड्याने व गर्दीने भाविक गुदमरले गेले. त्यामुळे 5 ते 6 भाविक चक्‍कर येऊन रांगेतच कोसळण्याच्या घटना घडल्या. यापैकी जास्त गंभीर झालेल्या सरिता समाधान महिंगडे (रा. पसरणी, ता. वाई, जि. सातारा), संजय दिगंबर गवारे (वय 35, रा. बुलढाणा) या भाविकांना मंदिर समितीच्या रुग्णवाहिकेतून सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर दोन्ही भाविकांना घरी सोडून देण्यात आले. उन्हाच्या तडाख्यामुळे पंढरीत आलेल्या भाविकांना त्रास सहन करावा लागला.  वाढत्या तापमानापासून भाविकांना त्रास होऊ नये यासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी होत आहे.