Wed, Nov 21, 2018 10:08



होमपेज › Solapur › संत तुकाराम महाराज संतपीठास मान्यता

संत तुकाराम महाराज संतपीठास मान्यता

Published On: May 20 2018 10:25PM | Last Updated: May 20 2018 10:24PM



पंढरपूर :  प्रतिनिधी

 गेल्या सुमारे 30 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या संत तुकाराम संत विद्यापीठास मुख्यमंत्र्यांनी शनिवारी तत्त्वतः मान्यता दिली असून अभिमत विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची आषाढी यात्रेच्या वेळी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या विद्यापीठासाठी स्थापन करण्यात आलेल्या मार्गदर्शक समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासह अन्य 14 जणांची या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. 

याविषयी सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रातील संत परंपरा, वारकरी संप्रदाय याचा अभ्यास केला जावा, याचा प्रसार व्हावा यासाठी संत तुकाराम विद्यापीठ सुरू करावे, अशी शिफारस नाडकर्णी आयोगाने केली होती. त्यानंतर पंढरपूर मंदिरे कायदा अस्तित्वात आला आणि त्या कायद्यातही कलम 32 (2) (छ) नुसार वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयाचे व भागवत धर्माचे संशोधन, प्रचार, प्रसार आणि अभ्यास करण्यासाठी संत तुकाराम महाराज संतपीठ स्थापन करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. मात्र, संत विद्यापीठ स्थापनेचा विषय प्रलंबित होता.

 दरम्यान, मागील महिन्यात मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत विद्यापीठाचे स्वरूप आणि अभ्यासक्रम याविषयी चर्चा झाली होती. शनिवारी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी या अभिमत  विद्यापीठास तत्त्वतः मान्यता दिली आहे. तसेच विद्यापीठाचे निश्‍चीत स्वरूप, अभ्यासक्रम निश्‍चित करण्यासाठी तज्ज्ञांची 15 सदस्यीय मार्गदर्शक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विजय भटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर  संत साहित्याच्या अभ्यासक सौ. अरुणा ढेरे, विवेक घळसासी, सदानंद मोरे, गणेश सुर्वे, शंकर अभ्यंकर, सुभाष लोहे, अरविंद देशमुख, शांताराम बुटे, विद्याधर ताठे, एल.के. मोहरीर, ज्ञानेश्‍वर महाराज देशमुख, रामचंद्र देखणे, चैतन्य महाराज देगलूरकर  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती संत विद्यापीठाची रचना, अभ्यासक्रम, ब्रहत् आराखडा, आस्थापनेची रचना, वर्ग पद्धती व इतर अनुषंगीक सूचना करणार आहेत. सध्य स्थितीत पर्यटन महामंडळाच्या जागेत पर्यटक निवास येथे हे विद्यापीठ सुरू करण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. संतांच्या अभ्यासक्रमावर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.  येत्या आषाढी यात्रेच्या वेळी मुख्यमंत्री स्वतः या विद्यापीठाची अधिकृत घोषणा करतील असे अधिकृत सूत्रांकडून समजते.