Wed, Jun 26, 2019 12:05होमपेज › Solapur › स्वीकृत नगरसेवकपदासाठी युवकांना संधी

स्वीकृत नगरसेवकपदासाठी युवकांना संधी

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 9:42PMपंढरपूर : प्रतिनिधी

नगरपालिकेच्या स्वीकृत 3 नगरसेवकपदी सत्ताधारी आ. परिचारक गटाने युवकांना संधी दिली असून, त्यापैकी 2 युवक पहिल्यांदाच पालिकेत प्रवेश करीत आहेत. तर, सुमारे 7 वर्षांनंतर आदित्य फत्तेपूकर यांची पालिकेत एंट्री होत आहे. तिन्ही उमेदवारांनी गुरुवारी जिल्हाधिकार्‍यांकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून, तिन्ही निवडी बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट आहे. 

पंढरपूर नगरपालिकेतील परिचारक गटाच्या तीन नगरसेवकांनी त्यांची निश्‍चित केलेली 15 महिन्यांची मुदत संपल्यानंतर राजीनामे दिले होते. त्यामुळे या रिक्त जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले होते. अनेकांनी या पदासाठी फिल्डिंग लावली होती आणि जोरदार प्रयत्न सुरू केले होते. 

आ. परिचारकांनी मात्र आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन सामाजिक समतोल साधण्याबरोबरच युवक वर्गास आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला आहे. मलोजी शेंबडे आणि श्रीनिवास बोरगावकर या दोन युवकांना पहिल्यांदाच नगरसेवकपदाची संधी मिळाली आहे. तर आदित्य फत्तेपूकर यांनाही परिचारकांनी संधी दिली आहे. यापुर्वी 2006 साली फत्तेपूरकर काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर नगरपालिकेत गेले होते. त्यानंतर 7 वर्षांनी त्यांना पुन्हा नगरपालिकेत जाण्याची संधी परिचारकांनी दिली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगरसेवक अनिल अभंगराव, अ‍ॅड. गुरूनाथ अभ्यंकर, सुजित उर्फ राजू सर्वगोड, शाम गोगाव, अंबादास वायदंडे आदी उपस्थित होते.