Thu, Jul 18, 2019 08:03होमपेज › Solapur › न. पा. पाणीपुरवठा विभागाचे नियोजन पूर्ण

न. पा. पाणीपुरवठा विभागाचे नियोजन पूर्ण

Published On: Jul 14 2018 12:57AM | Last Updated: Jul 13 2018 11:16PMपंढरपूर : सुरेश गायकवाड

आषाढी यात्रेत येणार्‍या भाविकांना शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. शहराला दैनंदिन 8 मोठ्या टाक्यांव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असून 65 एकर येथेही पाणी टाकीवरुन पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तर वाखरी पालखी तळ येथे 8 लाख लिटर क्षमतेच्या हौदाव्दारे पाणी पुरवठा करण्याचे  नियोजन करण्यात आले आहे. यात्रा काळात दररोज 32 एमएलडी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

आषाढी यात्रेस 12 ते 15 लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार भाविकांना पुरवण्यात येणार्‍या अत्यावश्यक सेवासुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. यात्रेत भाविकांना पिण्याचे पाणी महत्त्वाचे आहे. अशुध्द पाणी पिल्याने भाविकांच्या आरोग्याला अपायकारक ठरू शकते.त्यामुळे यात्रेत शुध्द पाणी पुरवठा करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी शहरातील विविध भागांत 8 मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांद्वारे सद्या पंढरपूर शहराला दररोज एक वेळ शुध्द पाणी पुरवठा केला जात आहे.  याकरिता दैनंदिन 24 एमएलडी पाण्याचा वापर केला जात आहे. याच पाण्यांच्या टाक्यांव्दारे यात्रा काळात दररोज दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 

मनिषानगर लिंक रोड येथील जुने जलशुध्दीकरण केंद्र येथून दररोज 22 एमएलडी पाणी शुध्दीकरण करुन वितरीत केले जात आहे. तर सुधारीत जलशुध्दीकरण केंद्र येथून 13 एमएलडी पाणी शुध्दीकरण करुन पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच यात्रा काळात  65 एकर येथील भक्‍तीसागर येथे उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीव्दारे येथील नळपाणी पुरवठा योजनेला व टँकर भरण्यासाठी 4 एमएलडी पाण्याचा वापर केला जाणार आहे. तर वाखरी पालखी तळ येथे बांधण्यात आलेल्या 8 लाख लिटर क्षेमतेच्या हौदात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तर चंद्रभागा वाळवंट व गोपाळपूर रोड येथे नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. 

पाईपलाईन लिकेज होऊन सांडपाणी पाईपलाईनमध्ये मिसळणार नाही. याची दक्षता विभागाकडून घेण्यात आली आहे. नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली  पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव व कर्मचारी यात्रेत शुध्द व सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

चार ठिकाणी टँकर भरण्याचे नियोजन
मनिषा नगर येथील जुलशुध्दीकरण केंद्र, नवीन अग्नीशमन केंद्र, पत्राशेड व 65 एकर येथे पाण्याचे टँकर भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.आषाढी यात्रेत प्रशासनाचे व पालख्यांबरोबर आलेल्या अशश एकूण 70 टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.