Tue, Aug 20, 2019 04:09होमपेज › Solapur › पाटलांच्या करामतीने पोलिस ठाणे झाले वादग्रस्त!

पाटलांच्या करामतीने पोलिस ठाणे झाले वादग्रस्त!

Published On: Apr 18 2018 10:26PM | Last Updated: Apr 18 2018 9:50PMपंढरपूर : प्रतिनिधी

करकंब पोलिस ठाण्याचे ए.पी.आय. दीपक पाटील यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी मुंबईत 5 दिवस चाललेले उपोषण आणि पंढरपुरात तहसीलसमोर झालेला  आत्मदहनाचा प्रयत्न आणि उपोषण, आंदोलन यामुळे करकंब पोलिस ठाणे बदनाम होऊ लागले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील आणि काही कथित गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक यांच्यातील  साप-मुंगूसाच्या खेळामुळे पोलिस ठाण्याची प्रतिष्ठा मात्र धुळीस मिळाल्याचे दिसून येत आहे. 

करकंब पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील मागील पाच ते सहा वर्षांपासून फेव्हिकॉलचा जोड लावून या पोलिस ठाण्यात चिकटून बसलेले आहेत. त्यांच्या बदलीपुढे जिल्हा पोलिस प्रशासनही हतबल झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आश्‍वस्त झालेले ए.पी.आय. दीपक पाटील अधिकच निर्धास्त होऊन आपल्या कार्यक्षेत्रात मोकळेपणाने काम करीत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातील वाळू तस्करी बिनधास्त सुरू आहे. अवैध धंदे, खासगी सावकारी सुरूच असून गावागावांत  भांडण-तंटे, हाणामार्‍या नव्या रंगात आणि नव्या ढंगात फोफावत आहेत. एकाही गावात कायदा आणि सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि शांतता असल्याचे दिसत नाही.  खासगी सावकार असोत की वाळू तस्कर आणि दारूनिर्मितीचे गुत्ते, जुगाराचे अड्डे यांना पोलिसांचेच अभय असल्याची चर्चा करकंब पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चालू आहे. गेल्यावर्षी एका जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकला असता जुगार खेळताना करकंब पोलिस ठाण्याचा एक पोलिस कर्मचारीच आढळून आला होता. एवढे घनिष्ठ संबंध अवैध धंदे आणि करकंब पोलिसांमध्ये निर्माण झालेले आहेत. 

या सगळ्या धंद्यांविरोधात कुणी आवाज उठवला तर ए.पी.आय. पाटील आपल्या अनोख्या पद्धतीने हा आवाज दाबून टाकत आहेत, असा आरोप करूनच पटवर्धनकुरोली येथील दादासाहेब चव्हाण, देवडे येथील पोपट कडलासकर, पेहे येथील महंमद पठाण, अतुल भोसले यांनी मुंबईत पाच दिवस उपोषण केले. या उपोषणकर्त्यांविरोधात दीपक पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ब्लॅकमेलिंगचे आरोप केले. 

मुंबईतील आंदोलनकर्ते हे स्वत:च गुन्हेगारी वृत्तीचे आहेत आणि त्यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी पंढरपूर तहसीलसमोर काही लोक सोमवार, 16 एप्रिल रोजी उपोषणास बसले होते. त्याचदरम्यान अलिम पठाण याने अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे खळबळ उडाली असली तरी पंढरपूर तहसीलसमोरचे उपोषण आणि अलिम पठाणचे पेटवून घेणे ए.पी.आय.पाटील प्रायोजित असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. 

दादासाहेब चव्हाण, महंमद पठाण, पोपट कडलासकर, अतुल भोसले यांचे आंदोलन ए.पी.आय. दीपक पाटील यांच्याविरोधात आहे. या आंदोलकांविरोधात पंढरपुरात दीपक पाटील यांनी बनावट आंदोलक उभा केल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही दीपक पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ करकंब बंद ठेवण्याचाही कार्यक्रम प्रायोजित केल्याचे उघडउघड बोलले जात आहे. 

करकंब पोलिस ठाण्यात एकंदरीत बिहारी थाटाने पोलिसांचा कारभार सुरू असल्याचा आरोप करून सूज्ञ माणूस करकंब पोलिस ठाण्यापासून लांब राहतो आहे.  करकंब पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिक पाटलांच्या करामतींना कंटाळले आहेत. ए.पी.आय. दीपक पाटील आणि कथित गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक यांच्यातील या साप-मुंगूसाच्या खेळामुळे करकंब पोलिस ठाणे मात्र पुरतेपणे बदनाम होत असल्याचे दिसते आहे. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनीच लक्ष घालावे, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.