Wed, Jul 08, 2020 01:06होमपेज › Solapur › शहीद गोसावी स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात  

शहीद गोसावी स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात  

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी 

काश्मीरमधील नागरोटा येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या शौर्यचक्रवीर मेजर कुणाल गोसावी यांचा प्रथम स्मृतिदिन येत्या 29 नोव्हेंबर रोजी साजरा होत असून पंढरपूर तालुक्यात यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. गोसावी कुटुंबियांच्यावतीने ज्याठिकाणी मेजर कुणाल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याच जागेवर शहीद स्मारक उभा करण्यात आले आहे. या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून 29 नोव्हेंबर रोजी स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. 

येथील शूरवीर मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी हे 29 नोव्हेंबर 2016 रोजी काश्मीरमधील नागरोटा येथील  दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. मेजर कुणाल यांच्या बलिदानानंतर पंढरपूर शहर आणि तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली होती. त्या बलिदानाचा प्रथम स्मृतीदिन 29 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. शहिदांच्या पराक्रमांना उजाळा देण्यासाठी तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. 

वाखरी (ता. पंढरपूर) या मेजर कुणाल यांच्या मूळगावी गोसावी कुटुंबीयांच्यावतीने शहीद स्मारक उभा करण्यात येत आहे. ज्याठिकाणी शहीद कुणाल गोसावी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याठिकाणी हे स्मारक उभा करण्यात आले आहे. स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून 28 तारखेपर्यंत काम पूर्ण होणार आहे. ब्रिगेडियर सुनील बोधे यांच्या हस्ते 29 नोव्हेंबर रोजी स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. यावेळी निवृत्त कर्नल सुहास जानकर, नि. कॅप्टन सुनील गोडबोले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी गोसावी कुटुंबियांकडून सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील शहीद जवानांच्या नातेवाईकांचाही सन्मान करण्यात येणार आहे.