होमपेज › Solapur › भुयारी गटारी अर्धवट; मैलामिश्रीत पाणी दारात!

भुयारी गटारी अर्धवट; मैलामिश्रीत पाणी दारात!

Published On: Jul 06 2018 10:13PM | Last Updated: Jul 06 2018 8:58PMपंढरपूर : प्रतिनिधी 

आषाढी यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली असली तरी नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा कारभार ‘राम भरोसे’च सुरू असल्याचे दिसून येत आहे. इसबावी हद्दीतील गट नं. 117, 118, 119 मध्ये भुयारी गटारीचे काम अपूर्ण आहे. परिणामी या भागातील घाण पाणी जाण्यासाठी पर्याय नसल्याने हे पाणी खड्ड्यात एकत्र केले जाते. या पाण्यात मैलामिश्रीत पाणी असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. नगरपरिषदेचे मात्र  उघड्या गटारींकडे दुर्लक्ष होत आहे.

दरम्यान, याठिकाणी खड्ड्यात साचलेले पाणी न.प.कडून उचलून इसबावी मलपे नाला येथील भुयारी गटार योजनेंतर्गत बांधलेल्या पंपगृहात सोडले जाते. मात्र नागरी वस्ती असलेल्या भागात गटारीची व्यवस्था नसल्याने या भागात साचलेले सांडपाणी उघड्या डबक्यात साचले जात आहे. या सांडपाण्यात मैलामिश्रीत पाणीदेखील असल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असून दुर्गंधीदेखील पसरत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

या भागातील भुयारी गटारीचे काम पूर्ण झाले नसताना नगरपालिकेने येथील नागरिकांना सांडपाण्याचा पाईप गटारीला जोडून घेण्याचे आवाहन केल्यामुळे नागरिकांनी सांडपाणी व शौचालयाचे पाईप गटारीला जोडले आहेत. गटारीचे पाणी वाहून जाण्यास अडथळे असल्याने गटारीचे पाणी चेंबूरमधून बाहेर येत आहे. हेच पाणी अनेक नागरिकांच्या घरासमोर साचत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्य व रस्त्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. 

117, 118 आणि 119 मधील सुमारे 200 कुटुंबांचे सांडपाणी, शौचालयांचे पाणी थेट उघड्यावर सोडलेले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. विशेष म्हणजे मागील 6 वर्षांपासून यासंदर्भात नागरिकांनी विविध पातळीवर तक्रारी करूनही कसलीही सुधारणा झालेली नाही. नगरसेवकही हतबल झालेले दिसत आहेत. त्यामुळे आता दाद मागायची कोणाकडे, असा यक्षप्रश्‍न नागरिकांपुढे उभा राहिला आहे. 

 इसबावी हद्दीतील गट नं. 117, 118, 119 मध्ये भुयारी गटार टप्पा क्र. 1 काम अजूनही  अपूर्ण आहे.  विशेष म्हणजे त्यानंतर टप्पा क्रमांक 2 पूर्ण होऊन टप्पा क्र. 3 लाही मंजुरी मिळाली आहे. मात्र अजूनही पहिल्या टप्प्यातील या ड्रेनेजचे काम अपूर्ण आहे. या तीनही गटांमधील सर्व घरे ड्रेनेजला जोडली असून त्यामुळे हे पाणी पुढे उघड्यावर सोडले आहे. अनेक ठिकाणी हे पाणी उघड्यावर सोडल्यामुळे दुर्गंधी, डास मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याठिकाणी असलेल्या एका मालमत्ताधारकाने ड्रेनेजचे काम अडवल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र त्यावर काहीही पर्याय काढला जात नाही. त्यामुळे या भागातील घाण पाणी वाहून जाण्यासाठी  इतर पर्याय नसल्याने या भागातील सांडपाणी खड्ड्यात सोडले जाते. मात्र नागरी वस्ती असलेल्या भागात गटारीची व्यवस्था नसल्याने या भागात साचलेले सांडपाणी उघड्या डबक्यात साचले  आहे. या सांडपाण्यात मैलामिश्रीत पाणीदेखील असल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असून दुर्गंधीदेखील पसरत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

या भागातील भुयारी गटारीचे काम पूर्ण झाले नसताना नगरपालिकेने येथील नागरिकांना सांडपाण्याचे  पाईप गटारीला जोडून घेण्याचे आवाहन केल्यामुळे नागरिकांनी सांडपाणी व शौचालयांचे पाईप गटारीला जोडले आहेत. गटारीचे पाणी वाहून जाण्यास अडथळे असल्याने गटारीचे पाणी चेंबूरमधून बाहेर येत आहे. हेच पाणी अनेक नागरिकांच्या घरासमोर साचत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्य व रस्त्याच्या समस्यांनी ग्रासले आहे.  याबाबत नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या.  2013 नोव्हेंबरपासून  अद्यापपर्यंत दखल घेतली  गेली नाही. नागरिकांनी लोकप्रतिनिधींपासून ते थेट राज्य शासनाच्या ‘आपलं सरकार’ या संकेतस्थळावर तक्रारी केल्या.  पुणे विभागीय शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी तर यासंदर्भात विधानपरिषदेतही शासनाचे लक्ष वेधून घेतले. त्याठिकाणी नगरपालिकेने सरळसरळ खोटी माहिती देऊन काम लवकरच पूर्ण करण्याची ग्वाही दिली. मात्र अद्यापही हे काम अपूर्ण आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने येथील घाण पाण्याच्या डबक्यावर औषध फवारणीदेखील केली जात नसल्याने डेंग्यूसदृश्य व मलेरियासारख्या आजारांनाही  नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात आता नगरपालिकेसमोर उपोषणासारखी आंदोलने करावी लागतील, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे. नगरपालिकेने येथील भुयारी गटारीचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करून या परिसरात तयार झालेली डबकी बुजवावीत व पक्के रस्ते तयार करुन द्यावेत, अशी मागणी येथील रहिवाशांतून होत आहे.