Sat, Jul 20, 2019 08:54होमपेज › Solapur › पोलिस कारवाईबद्दल मराठा समाजात असंतोष

पोलिस कारवाईबद्दल मराठा समाजात असंतोष

Published On: Sep 04 2018 11:38PM | Last Updated: Sep 04 2018 9:32PMपंढरपूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान झालेल्या एस.टी. बसेसच्या तोडफोडीच्या कारणावरून पंढरपूर तालुका पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईविरुद्ध मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊ लागला आहे. चुकीच्या पद्धतीने तरूण कार्यकर्त्यांना रात्री-अपरात्री घरात घुसून उचलून आणले जात आहे. या कारवाईमुळे संबंधित मुलांचे नातेवाईकही धास्तावले आहे. पोलिसांच्या या  कारवाईमुळे मराठा समाज पंढरपूर तालुक्यात आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आलेला आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20  जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान तालुक्यात अज्ञातांकडून अनेक ठिकाणी एस.टी. बसेसची तोडफोड झाली आहे. या तोडफोड प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसांपासून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत 30 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये अनेक महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अनेक कार्यकर्त्यांची नावे संशयास्पदरित्या या प्रकरणात अडकवली जात असल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत आहे. 

विशेष म्हणजे कार्यकर्त्यांना अटक करताना पोलिस रात्री- अपरात्री घरी जातात आणि त्यांना उचलून आणत आहेत. अनेक गावांमध्ये पोलिसांनी पाळत ठेऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले आहे. दोन दिवसांपूर्वी पंढरपूर शहरात काही कार्यकर्त्यांना मध्यरात्री 1 ते 2 वाजता त्यांच्या घरातून उचलले आहे. सराईत दरोडेखोर, अट्टल गुन्हेगारांना उचलावे तशा पद्धतीने पोलिसांकडून दहशत बसवणारी कारवाई केली जात असल्याचा आरोप या नातेवाईकांनी केला आहे. मध्यरात्री कारवाई करताना घरातील महिला, लहाण मुले, वयोवृद्ध नागरिक प्रचंड घाबरले असून अनेकांना या कारवाईमुळे मानसिक त्रास होत आहे. एस.टी. बसेसच्या तोडफोड प्रकरणी संशयित म्हणून संबंधितांना चौकशीकरिता बोलावून घेणे, शहानिशा करणे अवश्यक असताना पोलिस रात्री - अपरात्री उचलून आणत आहेत आणि कोठडीत टाकत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते, मराठा समाजातील नागरिकांतून पोलिसांच्या कारवाईबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात संपूर्ण तालुक्याचे पुन्हा एकदा आंदोलन उभा करण्याचे नियोजन केले जात आहे. येत्या काही दिवसांत पंढरपूर तालुका पोलिस आणि मराठा समाज असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.