पंढरपूर : नवनाथ पोरे
महाळूंग (ता. माळशिरस) ते पंढरपूर हा दुर्लक्षित जुना अकलूज मार्ग लवकरच विकसित केला जाणार असून शुक्रवारी 31 कि.मी.च्या या रस्त्याच्या विकासाला मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे. हा रस्ता विकसित झाल्यानंतर पंढरपूर- ते देहू-आळंदी पालखी मार्गावरील गर्दीचा ताण कमी होणार आहे. पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील 10 गावांची रहदारी तसेच पालखी मार्गाला चांगला पर्यायी मार्गही उपलब्ध होणार आहे.
पंढरपूर, देहू, आळंदी, भंडारा डोंगर विकास आराखड्यासंदर्भात शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पालखी मार्गासह तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामांचा आढावा घेतला. पंढरपूर, देहू, आळंदी, भंडारा डोंगर विकासाकरीता आणखी 212 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर पंढरपूर ते महाळूंग (ता. माळशिरस) या दरम्यान असलेल्या जुन्या अकलूज रस्त्याच्या विकासालाही तत्वत: मंजुरी दिली आहे. या मार्गाचे रूंदीकरण, त्यावरील आवश्यक त्याठिकाणी पूल तयार करण्यात येणार आहेत. जुना अकलूज रस्ता म्हणून या रस्त्याला ओळखले जाते. महाळूंगसह माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील जांबूड, दसूर, खळवे, नेवरे या भीमा नदीकाठच्या गावांबरोबरच पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, वाडीकुरोली, शेळवे, खेड भाळवणी, कौठाळी, वाखरी आणि शिरढोण या गावांतील लोकांच्या रहदारीसाठीसुद्धा हा रस्ता अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या हा रस्ता अतिशय दुरवस्थेला गेला असून पिराची कुरोली ते वाडीकुरोली दरम्यान सुस्थितीत असला तरी उर्वरित रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणे जिकीरीचे झालेले आहे.
गेल्या 50 वर्षात या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत गेले. प्रमुख पालखी मार्ग म्हणून पंढरपूर-महाड या मार्गाचेच रूंदीकरण करण्यात आले. त्यामुळे संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळासुद्धा बोरगावचा मुक्काम संपवून तोंडले-बोंडले येथे येतो आणि तेथून पुढे पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सोहळ्यासाबेत असलेले 4 ते 5 लाख आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत असलेले 3 ते 4 लाख तसेच इतर असे सुमारे 8 ते 10 लाख भाविक तोंडले-बोंडले येथून एकाच मार्गाने पंढरपूरकडे वाटचाल करीत असतात. या एकत्रित गर्दीचा ताण पडल्यामुळे संपूर्ण पालखी सोहळा मंदगतीने पुढे सरकतो. तसेच प्रशासनावरही बंदोबस्ताचा ताण पडतो.
या पालखी मार्गाला चांगला पर्याय म्हणून जुना अकलूज मार्ग विकसित करण्याची गरज व्यक्त होत होती. यापूर्वी 2010 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या रस्त्याच्या रूंदीकरणाचे भूमीपूजन झाले होते, मात्र त्यापलीकडे काहीही काम झाले नाही. त्यामुळे हा रस्ता जसाच्या तसाच असल्याचे दिसते. सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शेतकर्यांनी अतिक्रमणे करून रस्ता पोखरून टाकला आहे. तसेच काटेरी झाडे वाढली आहेत. जागो-जागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अनेक ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांना हा रस्ता विकसित झाल्यानंतर सोयीचे होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याच्या विकासाला मंजुरी दिल्यानंतर या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.