Tue, Apr 23, 2019 02:08होमपेज › Solapur › आंबेडकरी चळवळीच्या खच्चीकरणासाठी नक्षलवादाचा आरोप : प्रा. जोगेंद्र कवाडे

आंबेडकरी चळवळीच्या खच्चीकरणासाठी नक्षलवादाचा आरोप : प्रा. जोगेंद्र कवाडे

Published On: Jun 09 2018 10:58PM | Last Updated: Jun 09 2018 9:02PMपंढरपूर : प्रतिनिधी

भीमा कोरेगावची दंगल ही सरकार पुरस्कृत दंगल होती. त्या दंगलीचे सुत्रधार असलेल्या संभाजी भिडे यांच्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हत्येचा कट रचल्याचा कांगावा केला जात आहे. तसेच दलित चळवळ बदनाम करण्यासाठी नक्षलवादाशी आंबेडकरी चळवलीला जोडले जातेय, अशी टिका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे यांनी केली. पंढरपूर येथे आल्यानंतर कवाडे हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पीरिपचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, राज्य उपाध्यक्ष राजा इंगळे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव आदी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना कवाडे म्हणाले की,  दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांचे मारेकरी अद्याप सापडत नाहीत. या विचारवंतांची हत्या कोणी केली हे माहिती असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. भीमा कोरेगाव दंगलीचे सुत्रधार संभाजी भिडे यांच्यावर कारवाई होत नाही. हा शासन पुरस्कृत जातीय आतंकवाद आहे. तपास यंत्रणा सरकारच्या बाजूने काम करीत आहेत. एखाद्याचे नाव गुन्ह्यात अडकावणे पोलिसांसाठी सोपे काम असून एल्गार परिषदेच्या संयोजकांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नक्षलवादाशी संबंध जोडून आंबेडकरी चळवळ बदनाम करण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे.

भाजपने अच्छे दिनाची स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली. मात्र अच्छे दिन सुक्ष्मदर्शिका घेऊन शोधायची वेळ आलेली आहे. भाजपचा कारभार मुह मे राम बगलमे छुरी, असा असून रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांना मात्र अच्छे दिन आल्याची टिका कवाडे यांनी केली. रिपाई ऐक्याची रामदास आठवले यांची भूमिका स्वार्थी असल्याचा आरोप करून आ. कवाडे पुढे म्हणाले की, जेव्हा आठवले अडचणीत असतात तेव्हा त्यांना ऐक्य आठवते. त्यांचा स्वत:चा स्वार्थ साधल्यानंतर ते समाजाला सोडून देतात. मंत्रीपद मिळाल्यामुळे आठवले यांना अच्छे दिन आले मात्र दलितांना, आदीवासींना अच्छे दिन आलेले नाहीत असेही आ. कवाडे यावेळी म्हणाले. पंढरपुरात नगरपालिकेने बुध्द विहार बांधून द्यावे, अशीही मागणी आ. कवाडे यांनी यावेळी केली.