Wed, Jan 16, 2019 20:36होमपेज › Solapur › आषाढी यात्रा हायटेक : डॉ. भोसले

आषाढी यात्रा हायटेक : डॉ. भोसले

Published On: Jul 03 2018 10:52PM | Last Updated: Jul 03 2018 10:35PMपंढरपूर : प्रतिनिधी

  यात्रेसाठी येणार्‍या भाविकांना सुलभ व सुखकर दर्शन देण्यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील असून थेट दर्शनाबरोबर लाईव्ह दर्शन तसेच एलईडी स्क्रीन उभारून भाविकांना दर्शन देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची आषाढी वारी ही हायटेक पद्धतीने पार पाडण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी यात्रा नियोजनाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत डॉ. भोसले बोलत होते. याप्रसंगी सदस्य संभाजीराजे शिंदे, शकुंतला नडगिरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. अतुल भोसले म्हणाले की, आषाढी यात्रेसाठी देशभरातून तसेच राज्यातून 12 ते 14 लाख भाविक दाखल होण्याची शक्यता असल्याने यात्रा काळात कोणतीही आपत्कालीन घटना घडू नये म्हणून 15 ठिकाणी आपतकालीन व्यवस्था उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर मोठमोठे स्क्रीन लावून विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दर्शन मंडप व दर्शन रांगेतही पिण्याचे शुद्ध पाणी, चहा व नाष्टा भाविकांना मोफत देण्याचे नियोजन आहे. यात्रेत स्वचछतेला विशेष महत्त्व देण्यात येणार असून याकरिता दि. 17 पासून स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. त्यांना सातारा, 
मुंबई येथे 7 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  शहरात ठिकठिकाणी डस्टबिन ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मंदिर समितीच्या सर्वच्या सर्व 265 कर्मचार्‍यांचा आकृतीबंध दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांकडे सादर करून लवकरात  लवकर आकृतीबंध मंजूर करून घेणार आहे. पोलिस विभाग व इतर सर्व विभागांशी  समन्वय साधून यात्रा व्यवस्थीतपणे पार पाडण्यात येणार असून आषाढी यात्रेच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज विद्यापीठाची मुख्यमंत्र्यांकडून मान्यता घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात सर्व परवानग्या घेऊन निश्‍चित कालावधी घेऊ अथवा या आषाढीला बृहद आराखड्याचे भूमिपूजन निश्‍चितपणे करणार असल्याची माहिती डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

टोकन दर्शन लांबणीवर

पंढरीत येणार्‍या प्रत्येक भाविकांना दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये म्हणून मंदिर समितीच्यावतीने टोकन पद्धत दर्शन तसेच  सशुल्क दर्शन व्यवस्था निर्माण करण्याच्या  आलेल्या सूचना व निर्णयाची अंमलबजावणी करताना भाविक, वारकर्‍यांचे प्रमुख, महाराज मंडळीशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे घाईगडबडीत घेतलेला निर्णय योग्य ठरणार नसल्याने त्याचा निश्‍चित आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.