Tue, Jul 16, 2019 01:45होमपेज › Solapur › सोलापूरसाठी ७८ हजार टन साखर निर्यात कोटा

सोलापूरसाठी ७८ हजार टन साखर निर्यात कोटा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : नवनाथ पोरे

अतिरिक्त साखरेच्या उत्पादनामुळे साखरेचे दर आणखी घसरू नयेत याकरिता केंद्र सरकारने 20 लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली असून त्यापैकी सोलापूर जिल्ह्यात 78 हजार  561 टन साखर निर्यातीचा कोटा निश्‍चित केला आहे. या निर्यात धोरणानुसार साखर निर्यात केलेल्या साखर कारखान्यांना पुढील तीन वर्षांत परदेशातून कच्ची साखर नि:शुल्क आयात करता येणार आहे. दरम्यान, केंद्राच्या या निर्णयाचे साखर उद्योगातून मात्र थंडे स्वागत होत आहे. बहुतांश साखर कारखानदारांनी या निर्यात धोरणामुळे साखर कारखान्यांना फारसा फायदा होणार नाही, असे सांगितले आहे. साखर व्यापार्‍यांतूनही साखर निर्यातीसाठी केंद्र सरकारने आणखी सवलत देण्याची गरज व्यक्त होत आहे. 

गाळप हंगाम 2017-18 या  वर्षामध्ये देशात साखरेचे उत्पादन अतिरिक्त झाले असून देशाची गरज भागून यंदा साखर शिल्लक राहणार आहे. त्याचबरोबर पुढील वर्षीच्या गाळप हंगामात यापेक्षा जास्त साखर उत्पादन अपेक्षित असल्याने देशातील साखरेचे दर कोसळून साखर कारखानदारी अडचणीत येईल आणि शेतकर्‍यांनाही त्याचा फटका बसेल हे लक्षात घेऊन अन्न आणि नागरीपुरवठा मंत्रालयाने 20 लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. त्यानुसार देशातील सर्व साखर कारखान्यांना त्यांच्या उत्पादन साखरेच्या किमान 6 टक्के साखर निर्यात कोटा निश्‍चित करून दिलेला आहे.  किमान सूचक निर्यात कोटा योजनेंतर्गत जे साखर कारखाने साखर निर्यात करतील त्यांना पुढील तीन वर्षांत कच्ची साखर आयात शुल्क माफ करण्यात येणार आहे. या योजनेत सहभाग न घेणार्‍या साखर कारखान्यांना पुढील कोणत्याही योजनेत सवलत दिली जाणार नाही, असेही शासनाने जाहीर केले आहे.  या योजनेनुसार 20 लाख टन साखर निर्यात केल्यानंतर देशातील गरजेपुरती साखर शिल्लक राहून साखरेचे दर चांगले राहतील आणि कारखान्यांना पर्यायाने शेतकर्‍यांनाही याचा लाभ होईल, अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे.

मात्र या योजनेनुसार साखर निर्यात केल्यास सध्याच्या घडीला प्रत्येक क्विंटलमागे किमान 600 ते 700 रुपये तोटा सहन करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील साखरेचे दर सध्या 2300 रुपये क्विंटल आहेत, तर भारतात 28 मार्च रोजी 2800 ते 2990 रूपये प्रति क्विंटल साखरेचे दर राहिलेले आहेत. या दराचा विचार केला असता साखर निर्यात केल्यास प्रत्येक साखर कारखान्यास क्विंटलमागे 600 ते 700 रुपये तोटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना केंद्राने निर्यात अनुदान द्यावे, अशी साखर कारखानदारांची मागणी आहे. सर्वच साखर कारखान्यांना त्यांच्याकडील उत्पादित केलेल्या साखरेच्या केवळ 6 टक्के साखर तोट्यात विकावी लागली तरी 94 टक्के साखरेला चांगला दर मिळेल आणि त्यातून शेवटी कारखान्यांचा फायदाच होईल, अशीही शक्यता काही साखर कारखानदार व्यक्त करीत आहे. 

साखर व्यापार्‍यांतून या निर्णयाचे स्वागत होत असून केंद्र सरकारने साखर  निर्यातीसाठी अजूनही काही सवलती देण्याची गरज असल्याचे मत व्यक्तहोत आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता जिल्ह्यात 30 पेक्षा जास्त सहकारी आणि खासगी साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांना त्यांच्या उत्पादित साखरेनुसार 6 टक्केप्रमाणे निर्यात कोटा जाहीर करण्यात आलेला आहे. गाळप हंगाम घेतलेल्या 24 साखर कारखान्यांना निर्यात कोटा ठरवून दिलेला आहे.  

सर्वाधिक निर्यात कोटा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास मिळाला असून सर्वाधिक 12 हजार 683 टन साखर निर्यात करावी लागणार आहे. या साखर निर्यात धोरणाचे साखर उद्योग आणि व्यापार्‍यांतूनही स्वागत होत आहे. 


  •