Mon, Apr 22, 2019 22:10होमपेज › Solapur › जिल्ह्याला साथीच्या आजारांचा विळखा

जिल्ह्याला साथीच्या आजारांचा विळखा

Published On: Aug 07 2018 1:02AM | Last Updated: Aug 06 2018 10:22PMसोलापूर : बाळासाहेब मागाडे

मागील पंधरा दिवसांपासून हवामानात होत असलेल्या सततच्या बदलांमुळे मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरत आहेत. परिणामी, ताप, थंडी, सर्दी, कोरडा खोकला यासारख्या साथीच्या आजारांचा जिल्ह्यातील रुग्णांना विळखा बसला आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांत ताप, सर्दी, कोरड्या खोकल्याचे शेकडो रुग्ण दाखल झाले आहेत.

जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांसह सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात अशा साथीच्या आजारांनी त्रस्त असलेले अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. शहरातील पालिकेच्या रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांची गर्दी वाढली असून रुग्णालयांना जागा अपुरी पडू लागली आहे.  खासगी रुग्णालयांतही मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत आहेत. 

मागील पंधरा दिवसांपासून सुरू झालेला ऊन-पावसाचा खेळ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा ठरला आहे. वातावरणात होणार्‍या या अचानक बदलाचे परिणाम शरीरावर होत असून थंडी, ताप, सर्दी, कोरडा खोकला आणि अशक्‍तपणा यामुळे नागरिक बेजार झालेे आहेत. दोन-चार दिवस जुजबी औषधांनी अंगावर काढल्यानंतर तापाचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे शरीरातील पांढर्‍या पेशींचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढली असून बाह्यरुग्ण विभागात 500 पेक्षा जास्त रुग्ण संसर्गजन्य तसेच साथीच्या आजारांवर उपचार घेत आहेत.

दाखल झालेल्या बहुतांशी रुग्णांत मलेरिया, डेंग्यू यांचेही रुग्ण असल्याने रक्‍त तपासणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. खासगी रक्‍त तपासणी केंद्रांवर त्यामुळे रुग्णांची रक्त तपासणी नमुने देण्यास एकच गर्दी होत आहे. तातडीने रिपोर्ट देण्यासाठी अतिरिक्त पैसे वसूल केले जात असल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.

बदलत्या हवामानाचा परिणाम

शहरात साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात मलेरियाचे असंख्य रुग्ण आहेत. रुग्णांनी रक्त तपासणी करून घेणे गरजेचे आहे. अतिसार, उलटी, श्‍वसनाचा त्रास, खोकला, ताप, घसा दुखणे ही लक्षणे आढळताच सार्वजनिक ठिकाणी जाणे रुग्णांनी टाळावे, हात स्वच्छ धुणे, खोकताना रुमाल वापरणे, पुरेशी झोप आणि पौष्टिक आहार अशा उपाययोजनांमुळे साथीचे आजार आटोक्यात येऊ शकतात, असा डॉक्टरांकडून सल्ला देण्यात येत आहे.

शहरात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचे सावट

मागील आठवड्यापासून सोलापूर महापालिकेकडून शहरवासियांना दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात दूषित पाण्यामुळे अनेकांना अतिसार, उलट्या व इतर आजारांचा सामना करावा लागत आहे. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचे सावट निर्माण झाले आहे.