Sun, Nov 18, 2018 00:44होमपेज › Solapur › पालखी महामार्ग कामाच्या विरोधात मंगळवारी वाखरीत रास्ता रोको

पालखी महामार्ग कामाच्या विरोधात मंगळवारी वाखरीत रास्ता रोको

Published On: Apr 12 2018 10:30PM | Last Updated: Apr 12 2018 9:28PMपंढरपूर : प्रतिनिधी

मोहोळ -पंढरपूर- आळंदी या पालखी महामार्गाचे काम चुकीच्या पद्धतीने चालले असून शेतकर्‍यांना कसल्याही प्रकारे विश्‍वासात घेतलेले नाही. अनेक ठिकाणी रस्ता एकाच बाजूने अनावश्यकरित्या वळवण्यात आलेला आहे. शेतकर्‍यांना अंधारात ठेऊनच काम रेटले जात असल्यामुळे या महामार्गाच्या कामाविरोधात शेतकर्‍यांनी मंगळवार  दि. 17 एप्रिल  रोजी रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. यासंदर्भात पालखी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलेले आहे. 

मोहोळ - पंढरपूर- आळंदी या पालखी महामार्गाचे काम लवकरच सुरू होत असून सध्या या महामार्गासाठी भूसंपादन करण्याचे काम सुरू झालेले आहे. हा रस्ता 6 पदरी असल्याचे सांगितले जात असून त्याकरिता 45 मीटर्सचे भूसंपादन केले जात आहे. जुन्या रस्त्याला लागूनच प्रस्तावित रस्ता केला जात असला तरी अनेक ठिकाणी हा रस्ता अनावश्यकरित्या एकाच बाजूला घेतला गेला आहे. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांचे संपूर्ण क्षेत्र या रस्त्यामुळे बाधीत होत आहे तर अनेक ठिकाणी रस्ता एकाच बाजूने घेतल्यामुळे लोकांची राहती घरे बाधीत होत आहेत. 

अनेक शेतकर्‍यांचे कायमस्वरूपीचे जलस्त्रोत या रस्त्याच्या कामामुळे बाधीत होणार असल्यामुळे शेतकर्‍यांचे उर्वरित क्षेत्र पाण्याअभावी नापीकीने प्रभावित होत आहे. त्यामुळे हा महामार्ग करीत असताना चुकीच्या पद्धतीने आराखडा तयार करण्यात आल्याचा आरोप शेतकर्‍यांतून होत आहे. त्यातच जुना सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता शेतकर्‍यांच्याच जमिनीतून गेलेला आहे. त्याचे भूतकाळात कधीच संपादन झालेले नाही किंवा शेतकर्‍यांना  त्याची यापूर्वी कसलीही नुकसान भरपाई मिळालेलीे नाही. त्यामुळे तो रस्ता ज्यांच्या शेतातून गेलेला आहेे त्यांच्याच शेतातून हा पालखी महामार्ग जात आहे. या सगळ्या तक्रारी शेतकर्‍यांनी हरकतीद्वारे नोंदवलेल्या असल्या तरीही आपल्या हरकतींचा विचार प्रशासन करीत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे हरकती आणि सुनावनीचा फार्स उरकून घेतल्याचा आरोप शेतकर्‍यांतून होत आहे. 

याअनुषंगाने वाखरी, भंडिशेगाव, वाडीकुरोली, पिराची कुरोली येथील शेतकर्‍यांची बाजीराव विहीर येथे  गुरुवारी बैठक झाली. या वेळी पालखी महामार्ग शेतकरी संघर्ष समिती स्थापना करून या मनमानीविरोधात संघर्ष करण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्‍त केला आहे. त्याचाच भाग म्हणून  मंगळवार दि. 17 रोजी  वाखरी येथे सर्व महामार्ग बाधीत शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. यासंदर्भात शेतकर्‍यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका पोलिस निरीक्षकांना लेखी निवेदन दिले आहे.