Wed, Mar 20, 2019 08:34होमपेज › Solapur › अध्यक्षपदाच्या वादाने ‘पद्मशाली ज्ञाती’ मधील  मतभेद उघड

अध्यक्षपदाच्या वादाने ‘पद्मशाली ज्ञाती’ मधील  मतभेद उघड

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 10:57PMसोलापूर : वेणुगोपाळ गाडी

गटातटांतील वाद, व्यक्तीद्वेष व राजकारणामुळे नेहमीच चर्चेत राहणार्‍या पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदाच्या वादामुळे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. हा वाद मिटविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होण्याची गरज असल्याची भावना सुजाण समाजबांधवांमधून व्यत होत आहे.

पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या  66 वर्षांच्या इतिहासात प्रथमच दोन अध्यक्ष निवडण्याचा अजब प्रकार घडला आहे. अध्यक्षपदाचा कालावधी तीन वर्षांकरिता आहे. गत 66 वर्षांत या संस्थेमध्ये एकही व्यक्ती दुसर्‍यांदा अध्यक्ष  न झाल्याचे सांगण्यात येते. या  पायंड्याला कोठे यांच्या फेरनिवडीने ‘ब्रेक’ बसला आहे. 

अध्यक्षपदासाठी महेश कोठे व सुरेश फलमारी यांच्यात रस्सीखेच झाली. निवड अविरोध होण्यासाठी इच्छुकांच्या मनधरणीचे प्रयत्न असफल झाले. दीड-दीड वर्षे अध्यक्षपद देण्याचा अजब फॉर्म्युुला ठेवण्यात आला. मात्र तो मान्य नसल्याने पेच निर्माण झाला. शेवटी  निवड समिती, विश्‍वस्तांनी कोठे यांची निवड जाहीर केली. यामुळे फलमारी गटातील असंतोष उफाळून आला. या गटाच्या कार्यकर्त्यांनी फलमारी हेच ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष असल्याचे सांगत एकच खळबळ उडवून दिली.  यामुळे अध्यक्षपदाची निवड वादग्रस्त होऊन समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे समाजाची अब्रू वेशीला टांगली गेली आहे. या मुद्द्यावरून टीकाटिप्पणी होत आहे. समाजाची सर्वोच्च संस्था समजल्या ज्ञाती संस्थेचा अक्षरश: पोरखेळ झाला आहे. 

अध्यक्षपदाचा वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सन 2006 सालीदेखील संस्थेच्या सर्वसाधारण सभेत अनेक इच्छुक असल्याने वाद झाला होता. त्यावेळी तीन इच्छुकांचे समाधान करण्यासाठी अध्यक्षपदाचा कार्यकाल एक-एक वर्षाकरिता विभागून देण्याचे निर्णय घेत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांसाठी एकूण तीन अध्यक्ष निवडण्याचा अजब विक्रम ज्ञाती संस्थेत झाला होता. तेव्हाचा एक-एक वर्षाचा व आताचा दीड-दीड वर्षाचा पायंडा हा अनिष्ठच म्हणावा लागेल.  विद्ममान अध्यक्षपदावरुन समाजाची सर्वत्र होत असलेली बदनामी पाहून सुजाण समाजबांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जर ज्ञाती संस्थेमध्ये गटातटाचे राजकारण, दुफळीचे चित्र असेल तर काय आदर्श उरला, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर याचे दूरगामी परिणाम समाजाला भोगावे लागतील, असा गर्भित इशाराही समाजातील जाणकार देत आहेत. समाजात राजकारणाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला, हेच अध्यक्षपदाच्या वादाने अधोरेखित झाले आहे. ही बाब गंभीरतेने घेऊन आवश्यक सुधारणा करण्याची जबाबदारी समाजाचे विश्‍वस्त व ज्येष्ठ मंडळींची आहे. समाजकारण व राजकारण या दोन भिन्न गोष्टी आहेत, याचीही जाणीव करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.