Sun, Sep 23, 2018 21:30



होमपेज › Solapur › तुळजाभवानी मंदिर समितीवर विश्‍वस्त मंडळाची नेमणूक करा

तुळजाभवानी मंदिर समितीवर विश्‍वस्त मंडळाची नेमणूक करा

Published On: Dec 23 2017 2:14AM | Last Updated: Dec 22 2017 11:10PM

बुकमार्क करा





उस्मानाबाद : प्रतिनिधी 

पंढरपूर व अन्य देवस्थानप्रमाणेच तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर समितीवर पदसिध्द जिल्हाधिकारी ऐवजी शासन अध्यक्ष व विश्‍वस्त मंडळाची नेमणूक करावी, अशी मागणी नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आ. सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी (21 डिसें.) विधानपरिषदेत केली. विधानसभेने संमत केलेले पंढरपूर अधिनियम, 1973 मध्ये सुधारणा करण्याकरीता विधेयक क्रमांक 61 च्या चर्चेच्यावेळी बोलताना आ. सुजितसिंह ठाकूर यांनी विधानपरिषदेत ही मागणी केली़  पुढे बोलताना आ़ ठाकूर म्हणाले, शासनाने वारकर्‍यांच्या भावनांचा आदर करुन पंढरपूर मंदिर समितीत सुधारणा करण्याचे विधेयक आणले.

तसेच श्री तुळजाभवानी मंदिर समितीवरही अध्यक्ष हे पदसिध्द जिल्हाधिकारी यांच्याऐवजी शासनाने अध्यक्ष व विश्‍वस्त असावेत, अशी मागणी केली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी पदसिद्ध आहेत. या मंदिर समितीची घटना निझाम राजवटीपासूनची आहे. या मंदिर समितीवर जिल्हाधिकारी पदसिद्ध अध्यक्ष असल्याने जिल्हाधिकारी पदावर चांगली अधिकारी व्यक्ती असेल तर चांगले काम होते. अन्यथा तुळजाभवानी मंदिर समितीवर पदसिध्द अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी हुकूमशाह पध्दतीने मनमानी कारभार करतात. भाविक भक्तांच्या तसेच नागरिक व लोकप्रतिनिधींच्या भावनांचा व सूचनांचा अनादर करुन स्वत:ला वाटेल तसे हे पदसिद्ध अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी कारभार करतात. या आधी पदसिध्द अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकार्‍यांचा भाविक भक्तांसह सर्वांनाच खूप वाईट अनुभव असल्याचे आ. सुजितसिंह ठाकूर यांनी विधिमंडळात सांगितले.