होमपेज › Solapur › फेरनिवडणुकीचा आदेश रद्द;  सत्ताधार्‍यांना जोरदार हादरा

फेरनिवडणुकीचा आदेश रद्द;  सत्ताधार्‍यांना जोरदार हादरा

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 11:37PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिका स्थायी समिती सभापतिपदाबाबत फेरनिवडणूक घेण्याचा विभागीय आयुक्‍तांचा आदेश मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्याने सत्ताधार्‍यांना जोरदार हादरा बसला आहे. दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अपील  करण्यासाठी एका महिन्याची मुदत देण्यात आल्याने महिनाभर परिस्थिती ‘जैसे थे’ राहणार आहे. 

सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी 1 ते 3 मार्चपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. 1 मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक निर्णय कार्यालयात सत्ताधारी उमेदवारांच्या अर्जांची पळवापळवी, प्रचंड गोंधळ झाला होता. गोंधळाच्या भरात भाजपच्या उमेदवारांना अर्ज भरता आला नाही, तर एका उमेदवाराचा अर्ज पळवून नेण्यात आला होता. यामुळे ही निवडणूक रद्द करावी, अशी मागणी भाजपने पीठासन अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे केली होती. त्यानुसार डॉ भारुड यांनी विभागीय आयुक्‍तांना याबाबत अहवाल दिला होता. विभागीय आयुक्‍तांनी या प्रकरणी पहिल्यांदा या प्रकरणी ‘योग्य निर्णय घ्या’ असे आदेश काढले, तर काही वेळानंतर निवडणूक प्रक्रिया रद्द करून फेरनिवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. भारुड यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून फेरनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. फेरनिवडणुकीच्या आदेशाविरोधात शिवसेनेचे उमेदवार गणेश वानकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन फेरनिवडणुकीला स्थगिती मिळविली होती.

या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर  न्यायमूर्ती अभय ओक यांनी  मंगळवारी 10 एप्रिल रोजी फेरनिवडणूक प्रक्रिया रद्द करून पहिली निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले.  यामुळे सत्ताधारी भाजपला जोरदार दणका, तर  शिवसेनेचे उमेदवार गणेश वानकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

या निकालामुळे  वानकर यांच्या सभापतीपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या उमेदवार राजश्री कणके यांच्या अर्जावर अनुमोदकाची सही नसल्यामुळे कणके यांचा अर्ज छाननीत बाद होणार आहे. यामुळे शिवसेनेचे वानकर हेच  सभापती होणार हे निश्‍चित  आहे. भाजपला ही मोठी चपराक आहे.

दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी कणके यांच्या वकिलांनी एका महिन्याची मुदत देण्याची केलेली विनंती न्यायाधीशांनी मान्य केली आहे. त्यामुळे  या प्रकरणी एक महिना परिस्थिती ‘जैसे थे’ राहील.

आमचा विजय म्हणजे सत्याचा विजय : वानकर 
निकालावर आपली प्रतिकिया देताना गणेश वानकर म्हणाले,  भाजपने सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले होते. मात्र सत्याचा वाली हा असतोच. आमचा न्यायालयावर विश्‍वास होता. आमचा हा विजय म्हणजे सत्याचा विजय आहे. 

शहर विकासाचे निर्णय घेणार : कोठे
भाजपने सतेच्या जोरावर प्रशासनावर दबाव आणून रडीचा डाव खेळला होता. मात्र विजय सत्याचाच झाला आहे. परिवहन समिती सभापतीपाठोपाठ स्थायी समिती सभापतीपद शिवसेनेकडे आले आहे.  येणार्‍या काळात शहर विकासाच्यादृष्टीने चांगले निर्णय घेणार आहे, असे मनपाचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी सांगितले. 
 

Tags : solapur municipal corporation, by Elections