Sat, Jul 20, 2019 15:14होमपेज › Solapur › जिल्ह्यात फक्त 46 टक्के पाऊस

जिल्ह्यात फक्त 46 टक्के पाऊस

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 09 2018 8:53PMसोलापूर : महेश पांढरे

सोलापूर जिल्हाच सध्या दुष्काळाच्या सावटाखाली असून बैलपोळा सणावरही पडसाद दिसून येत आहेत. पावसाळा संपत आला तरी अनेक तालुक्यात अद्यापही 50 टक्केपेक्षा कमी पाऊस पडला, त्यामुळे बळीराजा धास्तावला असून आता जिल्ह्यात दुष्काळच जाहीर करा, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

यंदा सरासरीत केवळ 46.30 टक्के पाऊस पडल्याने खरीप धोक्यात आला आहे. तर  रब्बी हंगाम आता वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.  बार्शी तालुक्यात 74 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे बार्शी वगळता इतर 10 तालुके 50 टक्केपेक्षा कमी पाऊस  असल्याने  बळीराजा चिंतातूर  आहे. जिल्ह्यातील  लघु आणि मध्यम प्रकल्पामध्ये 60 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने उन्हाळा कठीण जाणार आहे. अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरीत पाणीसाठा उपलब्ध नाही. तर पोळासणाला बैलाला अंघोळ घालण्यासाठी हातपंपाच्या पाण्याचा वापर करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. 

उत्तर, दक्षिण, मोहोळ, अक्कलकोट, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यात दुष्काळसदृश्य वातावरण आहे. त्यामुळे आताच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.   पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी  टंचाई संदर्भात बैठक बोलावली आहे. सध्या रब्बीतील कांदा आणि उसाची लागवड केली असली तरी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यानेही पीक आता वाया जाण्याची भीती  आहे. तर अनेक तळी आणि विहिरी कोरड्या असल्याने ग्रामीण भागात जनावरांना पिण्यासाठी पाणीही उपलब्ध होत नाही. त्यामुळे सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी विविध पक्ष आणि संघटनांनी केली आहे.