सोलापूर ः रामकृष्ण लांबतुरे
भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा रक्षाबंधन हा सण जेवढा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो तितकाच तो आधुनिकतेकडेही वळत आहे.
शिक्षण, कामानिमित्त आणि धावपळीच्या युगात दूर असलेल्या भाऊ-बहिणीच्या ‘राखी’चे बंध ऑनलाईनमध्ये असलेल्या माध्यमांमुळे आणखी घट्ट होताना दिसून येत आहेत. पाठीवर पाय देऊन जन्माला आलेल्या भाऊ-बहिणीमध्ये कितीही खट्याळ भांडण असोत, मात्र रक्षाबंधनाच्या सणाची चाहुल लागताच भाऊ-बहिणीची धावपळ चालू होते. रुसलेल्यांना ऐनकेनप्रकारे त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात दूर असले म्हणजे या भावा-बहिणीमधील व्याकुळता आणखी वाढते. अशावेळी त्याच्या मदतीला येतात ते कुरिअर्स सेवा, ई-मेल माध्यम, कधी ऑनलाईन कॉन्फरन्सचाही आधार घेतला जातो. कितीही दूर असले तरी या भावा-बहिणीतील अंतर इंटरनेटच्या मदतीने क्षणात दूर होऊन जाते. आता राखीचे बंधही ऑनलाईन होत या बहीण-भावाच्या नात्यांमधील गोडवा टिकवण्याचा प्रयत्न होत आहे.
पूर्वी भावंडं शहराच्या, जिल्ह्याच्या आसपास असायची. रक्षाबंधनाच्या सणादिवशी सहज जाता येत होते. शक्य नाही झाले तर पोस्ट कार्यालय मदतीला येतच होते. आता या देशा-देशांमधील अंतर कमी होऊन विदेश जवळच झाला आहे. लाखो तरुणांना विदेशातील करिअर खुणावू लागले आहे. त्यामुळे त्यांची पावले विदेशाकडे वळू लागली आहेत. तरीही स्वदेशातील संस्कार संस्कृतीचा विसर त्यांना पडत नाही. अशा कित्येक कारणांमुळे बहीण-भाऊ यांच्यातील अंतर वाढले तरी आधुनिकीकरणाची कास धरली तरी जीवापलीकडील जपणारे भावनिक नाते कसे विसरता येईल. एकीकडे राखीचे बंध ऑनलाईन होत असताना इंटरनेटच्या या युगात फेसबुक या सर्वाधिक पसंतीच्या सोशल नेटवर्किंग साईटवर रक्षाबंधनाविषयी अधिक काही पाहावयास मिळत नाही. त्यातही मार्क झुकेरबर्ग लक्ष घालतील, अशी अपेक्षा धरायला हरकत नाही.
एक रुपयापासून शंभरपर्यंत राख्या
सध्या बाजारपेठेत एक रुपयांपासून ते शंभराच्या पुढे राख्या उपलब्ध आहेत. नवनवीन राख्यांमध्ये गोंड्याच्या राख्या कालबाह्य होताना दिसून येत आहेत.
चांदी व सोन्याचा वर्क असलेल्या विशेष राख्या तसेच हिरेजडीत असलेल्या राख्या उच्चवर्गीयांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे सांगण्यात येत आहे. बाजारपेठेत राख्यांचे स्टॉल्स सजल्याचे दिसून येत आहे.
वॉटरप्रूफ लिफाफ्याची सोय
रक्षाबंधनाच्या या पवित्र सणानिमित्त टपाल आणि कुरिअर्स कार्यालयांतर्गत विशेष, विविध प्रकाराचे मनमोहक वॉटरप्रूफ लिफाफा उपलब्ध झाले आहेत. दहा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. हा रक्षाबंधन सण पावसाळ्यातच येत असल्याने विविध कंपन्यांनी चांगल्या प्रतीची पाकिटे तयार केली आहेत. पाण्यात गेले तरी ते भिजत नाही. भाऊ-बहिणीच्या भावनांवर, नात्यावर पाणी फिरु नये याची चांगली काळजी घेण्यात आली आहे. यामुळेच बहिणीची राखी दूरवरच्या भावापर्यंत तिच्या भावनांसह अलगत पोचवते.