Wed, Jun 26, 2019 17:29होमपेज › Solapur › ऑनलाईन बोगसगिरीमुळे गुरुजींच्या बदल्या रद्द होणार?

ऑनलाईन बोगसगिरीमुळे गुरुजींच्या बदल्या रद्द होणार?

Published On: May 28 2018 1:31AM | Last Updated: May 27 2018 9:45PMसोलापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या आदेशानुसार यंदा पहिल्यांदाच प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन प्रणालीने पूर्ण करण्यात आले. मात्र या बदली प्रक्रियेत काही शिक्षकांनी बोगसगिरी केलेली असल्याने या बदल्या वादग्रस्त ठरल्या आहेत. याबद्दल काही संघटनांनी न्यायालयाच्या दारात दाद मागण्याची तयारी सुरू केली असल्याने पुन्हा बदली प्रक्रिया यंदाही रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सोलापूर जिल्ह्यात 4900 शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन प्रणाली करण्यात आले. यापैकी सुमारे दीड हजार शिक्षकांनी बदलीसाठी बोगस  माहिती ऑनलाईनवर भरली असल्याचे दिसून येत आहे.  त्यामुळे अनेक शिक्षकांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे .

बोगसगिरी करणार्‍या शिक्षकांच्या विरोधात काही शिक्षक संघटना व अन्यायग्रस्त शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे तक्रारी दाखल केले आहेत. या तक्रारीनुसार जिल्हा परिषदेकडून विस्थापित होणार्‍या शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र यासाठी किती वेळ लागेल याची माहिती शिक्षण विभागाला नाही.

ऑनलाईन बदल्या गुंतागुंतीचा विषय असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याप्रकरणी सोयीची भूमिका घेत आलेल्या तक्रारी पंचायत समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. रोजच चुकीच्या बदल्यासंदर्भात तक्रारी वाढत असल्याने जिल्हा परिषद पातळीवर हा विषय सुटेल याची शक्यता कमी आहे. त्यामुळे काही शिक्षकांनी व संघटनांनी बदल्यासंदर्भात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.

गतवर्षी राज्य शासनाने ऑनलाईन प्रणालीने शिक्षकांच्या बदल्या करण्याची भूमिका घेतली होती, मात्र त्यावेळी शिक्षकांच्या तक्रारीमुळे या बदल्या शासनाला करता आले नाहीत. यंदाच्या बदल्यांत पारदर्शकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी ह्याबद्दल शिक्षकांच्या प्रचंड तक्रारी असल्याने व येत्या पंधरा दिवसांत शाळा पुन्हा सुरुवात होत असल्याने झालेल्या ऑनलाईन बदल्या पूर्ण होतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . 

हव्या त्याच ठिकाणी बदल्या मिळविण्यासाठी काही शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे. असे बोगस प्रमाणपत्र रद्द करून विस्थापित शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे काम जिल्हा परिषद प्रशासनाला करावे लागणार आहे.  15 जून 2018 पूर्वी जिल्हा परिषदेला यात यश मिळेल का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड, शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांचे कौशल्य आता पणास लागणार हे मात्र निश्‍चित आहे.