Mon, Aug 19, 2019 07:29होमपेज › Solapur › कांद्याने केला शेतकर्‍यांचा वांदा, आवक वाढल्याने दर उतरले

कांद्याने केला शेतकर्‍यांचा वांदा, आवक वाढल्याने दर उतरले

Published On: Aug 24 2018 1:03PM | Last Updated: Aug 24 2018 12:53PMसोलापूर : संतोष आचलारे

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन दिवसापासून कांद्याची आवक वाढून दर कमी झाले आहेत. एक नंबर कांदा सात रुपये किलो दराने विकला जात असल्याने शेतकर्‍यांसमोर समस्या निर्माण झाली आहे. बकरी ईद निमित्त सोलापूर बाजार समितीमधील दोन दिवस बाजार बंद असल्याने आवक वाढून दर कमी झाल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे. 

बकरी ईदनिमित्त बुधवार व गुरुवार असे दोन दिवस बाजार समितीमधील कांदा बाजार बंद होता. शुक्रवारी एकाचवेळी कांद्याची आवक वाढली. सुमारे दोन कोटी रुपयांच्या आसपास कांदा आवक झाल्याने यावेळी दर कमी झाले. मागील आठवडाभरार दहा रुपये पेक्षा जास्त दराने कांदा विकला जात होता. शुक्रवारी मात्र नंबर एकचा कांदा सात ते आठ रुपये दराने विकला गेल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला. 
बाजार समितीत १८ ऑगस्ट रोजी ७९ लाख रुपयांचा ९९ ट्रक कांदा आवक झाली होती. १९ ऑगस्ट रोजी ९९ ट्रक कांद्याची आवक झाली. २० ऑगस्ट रोजी १ कोटी ३२ लाखाचा तब्बल १७६ ट्रक कांदा आवक झाला. २१ ऑगस्ट रोजी १ कोटी ३५ लाख रुपयांचा १६९ ट्रक कांदा आवक झाला आहे. शुक्रवारी दोनशेपेक्षा जास्त ट्रक कांद्याची आवक झाल्याचे चित्र दिसून येत होते. सुमारे दोन कोटी रुपयांचा कादां बाजार समितीत दाखल झाल्याने दरात सुमारे पाच रुपयांची घट झाल्याची माहिती कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी दिली. 

मागील वर्षी दोन ते पाच हजार रुपयांचा दर कांद्याला मिळत होता. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला दर मिळत असल्याने नगर, बारामती, इंदापूर, कर्नाटक व मराठवाडा आदी भागातील शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला जातो. गत कांही दिवसापासून कांद्याला दरच मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली. 

दहा हजाराचे नुकसान झाले : बापू गोधडे 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला दर मिळत असल्याने 50 पोते कांदा विक्रीसाठी आणला होता. मागील कांही दिवसापुर्वी आणलेल्या कांद्यास 12 रुपयांचा दर मिळाला होता. आज मात्र एक नंबरचा कांदा आठ रुपये दराने विकला जात आहे. कांदा लागवडीसाठी प्रचंड खर्च असून येणार्‍या रक्कमेतून कांहीच शिल्लक राहत नाही. सरकारने यासाठी कांहीतरी उपाय योजना करावी अशी प्रतिक्रिया नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बापू गोधडे यांनी दै. पुढारीला दिली.