Thu, Jun 20, 2019 00:36होमपेज › Solapur › सोलापूर : कांदा विक्रीचा नवा विक्रम

सोलापूर : कांदा विक्रीचा नवा विक्रम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूरः प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थापनेपासून सोमवारी कांद्याची ऐतिहासिक आणि विक्रमी उलाढाल झाली. या दिवसाचा विक्रम मंगळवारी दुसर्‍या दिवशीच मोडून निघाला. यादिवशी 10 कोटी 97 लाख रुपयांची कांदा विक्री करुन सोलापूर बाजार समितीत पुन्हा एका नवा ऐतिहासिक विक्रम झाल्याची माहिती सचिव विनोद पाटील यांनी दिली. 

सोमवारी 405 ट्रक कांद्याची आवक झाली, तर सुमारे 9 कोटी 32 लाख 19 हजारांचा कांदा विकला गेला आहे. संपूर्ण बाजापेठेत सुमारे 10 कोटी 72 लाख 61 हजारांची उलाढाल झाली होती. मंगळवारी 426 ट्रक कांद्याची आवक झाली. पाच हजार रुपये प्रति किंटल दर सर्वाधिक यावेळी मिळाल्याने कांद्याची उलाढाल वाढली. यातून एकूण 9 कोटी 97 लाख 23 हजार रुपये कांद्याची विक्री झाली. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज कांद्याची मोठी आवक होते. सोलापूर जिल्ह्यासह परजिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी सोलापूरच्या बाजारपेठेत येतो. चांगला भाव मिळतो आणि काट्यांची मारामारी होत नाही म्हणून शेतकरी सोलापूरला आपला कांदा घेऊन येतात. बाजार समितीमार्फत सोयीसुविधा देण्यात येत असल्याने सोलापुरात शेतीमाल घेऊन येणार्‍यांची संख्या वाढली आहे. कांदा विक्रीच्या वाढत्या उलाढालीने अधिकार्‍यांचे मनोबल उंचावले आहे. याशिवाय संपूर्ण उलाढाल सुमारे 10 कोटींवर गेल्याने हा बाजार समिती स्थापनेपासूनच विक्रम असल्याचा दावा प्रभारी सचिव पाटील यांनी केला आहे. फळे, भाजीपाला तसेच डाळिंबालाही चांगला दर मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले. 

प्रशासक कुंदन भोळे आणि प्रभारी सचिव विनोद पाटील यांनी शेतकर्‍यांना सोयीसुद्धा देण्याला आणि त्यांच्या मालाची सुरक्षा करण्याला प्राधान्य दिले आहे. सोमवारी कांदा चोरी रोखण्यासाठी 50 सुरक्षारक्षकांची तैनात करण्यात आली. यामुळे  शेतकर्‍यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. कांद्याची चोरी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी पुरता हैराण झाला होता. मात्र दोन ते तीन दिवसांपूर्वी टाकलेल्या धाडीत कांदा चोरीला आळा घालण्यात आल्याने बळीराजाची चिंता दूर झाली आहे.