Fri, Apr 26, 2019 02:13होमपेज › Solapur › वर्षभर बैठका, तरीही जि.प.चा निधी खर्च होईना!

वर्षभर बैठका, तरीही जि.प.चा निधी खर्च होईना!

Published On: Feb 21 2018 1:19AM | Last Updated: Feb 20 2018 10:21PMसोलापूर : संतोष आचलारे

जिल्हा परिषदेला प्राप्‍त असलेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी गतवर्षभरात जि.प. अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी अनेकवेळा बैठका घेतल्या. मात्र मार्च अखेरचा महिना उजाडत आला तरीही निधी खर्च करण्यात यश मिळाले नाही. निष्क्रिय अधिकार्‍यांच्या कृत्यावर अजूनही पांघरुण घालण्याचाच प्रकार पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी करीत असल्याचे दिसून येत आहे. 

जि.प. अध्यक्षपदी संजय शिंदे व उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांची निवड गतवर्षी मार्च महिन्यात झाली. या निवडीनंतर लगेचच विषय समिती सभापती निवडी होण्यापूर्वीच जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेऊन निधी खर्च करण्याचे आदेश दिले होते. शिंदे यांचा यापूर्वीचा अनुभव असल्याने मार्चअखेरपर्यंत निधी खर्च करण्यात प्रशासकीय यंत्रणेत गती येण्याची अपेक्षा होती. मात्र केवळ बैठक घेतल्यानंतर निर्णयाच्या अंमलबजावणीकडे फारसे लक्ष दिले नसल्याने शेवटी पदरी निराशाच पडत आहे. 
बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग हे दोन विभाग सातत्याने निधी खर्च करण्यात अपयशी ठरत आहेत. प्राथमिक शिक्षण विभागासाठी मंजूर असलेला निधी बांधकाम विभागाकडून वेळेत खर्च करण्यात येत नसल्याने जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी चक्‍क काही दिवसांपूर्वी बांधकाम विभाग दोनच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिय्या मारुन निधी खर्च करण्यासाठी मार्ग मोकळा करुन घेतला. शिक्षणाधिकार्‍यांची ही परिस्थिती असेल तर पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर मंजूर असलेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी किती दिवस लागणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

जिल्हा नियोजन समितीकडून दोन वर्षांपूर्वी मिळालेला निधी मार्च 2018 पर्यंत खर्च करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा परिषद अधिकारी व पदाधिकार्‍यांना माहिती होते. तरीही यासाठी अंमलबजावणीत कोठेतरी कमी पडल्याने हा निधी अखर्चित राहात आहे. बांधकाम विभाग व समाजकल्याण विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या काही अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी टक्केवारीची पध्दत अबाधित ठेवल्यानेच हा प्रकार होत असल्याचे आता दिसून येत आहे. दलित वस्ती सुधार योजनेचे काम असो की ग्रामीण भागातील रस्ते, तीर्थक्षेत्र विकासाचे काम असो जोपर्यंत जिल्हा परिषदेत ठेकेदार स्वत: बांधकाम विभागात टेकण लावण्यासाठी उपस्थित होत नाही तोपर्यंत टेबलावरील फाईल हलतच नसल्याची परिस्थिती आता झाकून राहिली नाही. पदाधिकार्‍यांनाही याविषयी माहिती असतानाही त्यांनी याकडे केलेले दुर्लक्ष संशयास्पद ठरत आहे. काम घेणार्‍या ठेकेदारांनी जिल्हा परिषदेत फायलीला टेकण लावल्यानंतर लगेच ठेकेदाराकडेच फाईल बांधकाम विभागाकडून त्याच्या हातात देण्यात येते. त्यानंतर या ठेकेदाराला अर्थ विभागात जाऊन पुन्हा टेकण लावण्याची वेळ येते. जोपर्यंत याठिकाणीही टेकण लावण्यात येत नाही तोपर्यंत येथूनही फाईल न हलण्याची प्रथा अजूनही शाबूत असल्याने जि.प. अध्यक्ष संजय शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या कार्यक्षमतेवर व पारदर्शकतेवर शंका निर्माण होत आहे. 

रविवारी सुटीचा दिवस असतानाही जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांनी बैठक आयोजित करुन निधी खर्चाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारुडही उपस्थित होते. या बैठकीत अधिकार्‍यांचा नाकर्तेपणा स्पष्ट दिसून आल्याने डोक्याला हात लावण्याची पाळी आली आहे. आता वेळ कमी असल्याने आहे त्या परिस्थितीत, आहे त्या अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना सोबत घेऊन निधी खर्च करण्याचे आव्हान समोर असल्याने पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी सावधपणे भूमिका घेत अधिकार्‍यांचा नाकर्तेपणा जिल्हा परिषदेच्या कुंपणातच झाकून ठेवला आहे. मात्र कोंबडा झाकल्याने सूर्य उगवत नाही असे कधीच होत नाही. मार्चअखेरनंतरही निधी परत गेल्यास यंत्रणेत आमुलाग्र बदल करून पुढील वर्षाचे दर महिन्याला योग्य नियोजन करुन वेळेत निधी खर्च करण्याचा प्रयत्न जि.प. अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करावा लागणार आहे.