Wed, Mar 20, 2019 12:45होमपेज › Solapur › करमाळ्यात दोघांवर तलवारीने हल्ला, एक गंभीर 

करमाळ्यात दोघांवर तलवारीने हल्ला, एक गंभीर 

Published On: Sep 07 2018 4:55PM | Last Updated: Sep 07 2018 4:55PMकरमाळा: तालुका प्रतिनिधी 

बाजार समितीचा प्रचार करू नका म्हणून दोघा जणांवर तलवार, गज, काठी आणि टॉमीने हल्ला करून एकाला गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी १४ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशोक अप्पा गायकवाड व दिलीप उध्दव गायकवाड असे जखमी झालेल्या दोघांची नावे असून, अप्पा गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. त्‍यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरु आहेत. हा प्रकार करमाळा टेभूर्णी रस्त्यावर देवळाली बसस्थानकावर शुक्रवारी सकाळी पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास घडला. 

संदिप गुंड, लखन शिंदे, राहुल कानगुडे, सचिन कानगुडे लक्ष्मण ननवरे, सुधीर आले, संजय गावी, पप्पू शिंदे, नागेश ढेरे, बाळासाहेब शिंदे,  अश्रू आवटे, हनुमंत ननवरे, गहिनीनाथ कानगुडे असे संशयित आरोपींची नावे आहेत. याची फिर्याद कैलास महादेव कानगुडे यांनी दिली आहे. 

कैलास कानगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अशोक  गायकवाड व दिलीप गायकवाड हे सकाळी देवळाली स्टॅण्डवर होटेल शंभूराजे येथे चहा घेत असताना संदिप गुंड, लखन शिंदे, राहुल कानगुडे, सचिन कानगुडे आदिंनी या दोघांना दमबाजी केली. तुमच्या घरातील ७ जण तडिपार केले आहेत. तुमची मस्ती जिरली नाही, तुम्ही निवडणुकीचा प्रचार करायचा नाही म्हणून मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी राहुल कानगुडे याने अशोक गायकवाड याच्या डोक्यात तलवारीचा घाव घातला. सचिन कानगुडे याने काठीने दिलीप गायकवाड याच्या पाठीत मारून जखमी केले. लक्ष्मण ननवरे याने दगडाने मारहाण केली. सुधीर आवटे याने जगाने अशोक गायकवाड याला पाठीत मारून जखमी केले. उर्वरित संशयित आरोपींनी लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केले. यावेळी भाडंण सोडविण्यासाठी आलेल्या बाळू साळवे, अण्णा गुंड यांना तुम्हाला भांडणाचे काय करायचे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी सतिश गायकवाड यांनी या घटनेबाबत लोकांना बोलावून घेतले. यावेळी राजेंद्र घळके, नामदेव  गुंड, मारूती घळके यांनी जखमींना उपचारासाठी करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

याबाबत करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरीष्ठ पोलिस निरिक्षक राजेश देवरे पुढील तपास करीत आहेत.