Tue, Jul 23, 2019 11:13होमपेज › Solapur › सोलापूर : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार

सोलापूर : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार

Published On: May 26 2018 9:48PM | Last Updated: May 26 2018 9:48PMमोहोळ : प्रतिनिधी

भरधाव वेगात आलेल्या कारने डबलसीट दुचाकीला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र श्रीधर भोसले (वय ४० वर्षे रा. खवणी ता. मोहोळ) असे मृताचे नाव आहे. तर बाळासाहेब प्रभाकर शिंदे (रा. औंढी ता. मोहोळ) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शनिवारी (२६ मे रोजी) सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळमधील कन्या प्रशाला चौक येथे हा अपघात झाला. या प्रकरणी मोहोळ पोलिसात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र भोसले आणि बाळासाहेब शिंदे हे दोघे शनिवारी २६ मे रोजी मोटार सायकल क्रमांक एम.एच १३ सी.झेड ०९३२ ने सोलापूरहून मोहोळ कडे येत होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटार सायकल कन्या प्रशाला चौक मोहोळ येथे आली होती. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेली कार क्रमांक एम.एच. ०३ सी.एच. १९८४ ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ दोघांनाही उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. मात्र उपचारादरम्यान राजेंद्र यांचा मृत्यू झाला. तर बाळासाहेब शिंदे यांची प्रकृती चिंताजनक आहे.    

याबाबत मोहोळ पोलिसात कारचालक देवदत्त तोयनाथ पंथ रा. एन.ई.एस रोड भांडुप (पश्‍चिम) मुंबई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी अपघात ग्रस्त झालेली दोन्ही वाहने जप्त केली असून कारचालकास ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड.कॉ. अविनाश शिंदे हे करीत आहेत. 

मुलगी दवाखान्यात आणि वडीलांचा अपघाती मृत्यू

राजेंद्र भोसले यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांची इयत्ता ४ थी मधील मुलगी आजारी असल्यामुळे तिच्यावर सोलापूर सिव्हील हॉस्पीटल मध्ये उपचार सुरु आहेत. तिच्या औषध खर्चासाठी पैसे कमी पडल्याने ते पैशासाठी मोहोळकडे येत होते. मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने त्यांच्या मुलां बाळावरील वडीलांचे छ्त्र हरपले आहे. त्यांची एक मुलगी अॅडमिट असल्यामुळे तिच्यावर उपचारासाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे विविध सामाजिक संघटनांनी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे.