Thu, Apr 25, 2019 17:34होमपेज › Solapur › डाळिंबावर तेल्याचा प्रादुर्भाव

डाळिंबावर तेल्याचा प्रादुर्भाव

Published On: Jul 05 2018 1:42AM | Last Updated: Jul 04 2018 8:28PMभोसे (क.): अण्णासाहेब पवार

शेतकर्‍यांना कमी काळात पैसा करून देणार्‍या डाळिंब बागांवर सध्या तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून त्यावर ठोस असे औषध नसल्याने शेतकरी कोणी सांगतील ते औषध आणून फवारत आहेत. त्यामुळे बागेचा खर्च अपेक्षेपेक्षा जास्त वाढला आहे.

डाळिंबाच्या लागवडीमध्ये सोलापूर जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्यातील बहुतेक भाग आवर्षणप्रवण असल्याने डाळिंब या फळबागेखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. कारण डाळींब या फळझाडाची वाढ हलक्या ते मध्यम जमिनीत चांगली होत असून समशितोषण व कोरडे हवामान अनुकूल ठरत असल्याने दुष्काळी भागातील शेतकर्यांना हे फळपीक वरदान ठरत आहे. मात्र  अशा परिस्थितीत सध्या तेल्या रोगाची एक नवीन समस्या भेडसाऊ लागली आहे.   

सध्या तेल्या या रोगास अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे.  पावसाळी  हवामानात रोगाचा प्रादुर्भाव आणि वाढ अतिशय झपाट्याने होत आहे. तेल्या रोगाच्या वाढीसाठी साधारणत: उष्ण तापमान (28 ते 38 डी. से.), मध्यम ते भरपूर आर्द्रता (50 ते 90 %), अधुनमधून हलका पाऊस आणि ढगाळ हवामान अशा वातावरणात रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.

तसेच रोगकारक जीवाणु हे 50 डी. से. तपमानापर्यंत जिवंत राहू शकतात. हंगामाच्या सुरुवातीला नवीन बहार फुटल्यानंतर जोराचा मान्सुनपूर्व पाऊस झाल्यासही रोगाचा प्रादुर्भाव हमखास होत आहे. सध्या शेवते (ता.पंढरपूर) परिसरातील ज्या बागा धरलेल्या आहेत अशा बागांवर तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणार प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. हजारो रुपये खर्चून मोठ्या कष्टाने जपलेल्या बागांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या रोगावर नेमके औषध नसल्याने हाता तोंडाशी आलेल्या बागा जपण्यासाठी शेतकरी कोणतीही औषधे फवारत आहेत, यामुळे बागेचा खर्च मात्र आणखी वाढत आहे.  

रोगाची लक्षणे :  1) पानावरील रोगाची लक्षणे : रोगाची प्रथम सुरूवात ही पानांवर होते. अनुक्रमे कोवळ्या फुटी, फुले आणि फळे यावर रोग येतो. सुरुवातीला रोगग्रस्त पानावर लहान आकाराचे लंब गोलाकार ते आकारहीन पानथळ तेलकट डाग येतात. अनुकूल हवामानात हे डाग एकत्र येवून ते 1 ते 2 सेंमी. आकाराचे होतात. नंतर हे ठिपके काळपट रंगाचे होतात. ठिपक्यांच्या कडेला पिवळसर वलय दिसते, यावरून हा रोग ओळखणे सोपे जाते. हळूहळू रोगग्रस्त पाने पिवळी पडून मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. फुलकळीवरील रोगांची लक्षणे पानाप्रमाणे असतात. 2) फुलावरील रोगाची लक्षणे : फुलांवर व कळ्यांवर काळपट डाग पडतात व ते फुलकळी सोबत वाढू लागतात. 3) फांदीवरील रोगाची लक्षणे : पानाप्रमाणे कोवळ्या फुटीवर रोगाचे ठिपके साधारणत : फांदीच्या पेर्यावर फुटीच्या बेचक्यात दिसून येतात. ठिपक्याचे लांब गोलाकार चट्ट्यात रूपांतर होऊन ते गर्द तपकिरी व काळपट रंगाचे आणि थोडेसे खोलगट होतात. काही वेळेस  ठिपक्यांच्या ठिकाणी सालीस तडे जातात आणि रोगग्रस्त भागातून पुढील फांदी सुकून वाळून जाते. 4) फळावरील रोगाची लक्षणे : फळावर पानांप्रमाणे पाणथळ - तेलकट डाग पडतात. हे ठिपके हळूहळू वाढत जाऊन ते एकमेकात मिसळतात. रोगग्रस्त भाग तपकिरी ते काळसर - तेलकट होतो. रोगाचे प्रथमावस्थेत आढळणारे तेलकट डाग, अनियमित, लंबगोलाकार आकाराचे तसेच एकमेकात मिसळत असलेले मध्यभागी काळसर पडलेले असतात. नंतर फळाला रोगग्रस्त भागावर आडवे - उभे तडे जातात व फळे सुकतात. फळावर थोडा जरी रोग आला तरी त्यांची प्रत पूर्णपणे खराब होते आणि फळांना बाजारभाव मिळत नाही. या रोगामुळे 30 ते 50 % नुकसान होते, परंतु वाढीस पोषक वातावरण असताना अतिरोगग्रस्त बागेत 80 ते 100 % नुकसान होऊ शकते. 6) खोडावरील रोगाची लक्षणे : खोडावर सुरुवातीला पानथळ तेलकट डाग दिसतात. कालांतराने हे डाग तपकिरी होतात. खोडावर या डागांचे गर्डलिंग किंवा खाच तयार होते व तेथून झाड मोडते.