Sat, Mar 23, 2019 18:12होमपेज › Solapur › गांधी जयंतीला शिवनेरी ते मुंबई हजारो कर्मचारी काढणार पायी पेंशनदिंडी

गांधी जयंतीला शिवनेरी ते मुंबई हजारो कर्मचारी काढणार पायी पेंशनदिंडी

Published On: Aug 09 2018 7:02PM | Last Updated: Aug 09 2018 7:02PMबोंडले : प्रतिनिधी

 तीन दिवस संप करूनही समाधानकारक तोडगा निघत नसल्याने महाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेने आता २ ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी ते मंत्रालय  आसा लॉगमार्च आयोजित करणार आहे.  यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात येणार आहे.  

महाराष्ट्र शासनाने दि. ३१ ऑक्टोबर २००५ च्या अधिसूचने नुसार शासनाच्या सेवेत दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना म.रा.ना.से.अधि. १९८२ व १९८४ अंतर्गत निवृत्तिवेतन योजना बंद करून परिभाषित अंशदायी पेन्शन योजना (DCPS/NPS) सुरू केली आहे. सदर  योजनेचे स्वरूप व अंमलबजावणी पाहता या योजनेतून जुन्या पेंन्शन प्रमाणे सुनिश्चित निवृत्तिवेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे मृत्यू व सेवानिवृत्ती नंतरचे भविष्य असुरक्षित झाले आहे. त्यामुळे या नव्या अंशदायी पेंशन योजने विषयी राज्यातील हजारो कर्मचाऱ्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सदर अंशदायी पेंशन योजना (DCPS/NPS) बंद करून म.ना.से.अधि. १९८२ व ८४ ची जुनीच पेंन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आमच्या संघटनेने अनेकदा हजारो कर्मचाऱ्यासह धरणे, उपोषणे, मोर्चे, आंदोलने  केले आहेत. 

दि. १६ मार्च २०१६ च्या मंत्रालयावरील धरणे आंदोलनात वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी स्वतः येऊन जाहीरपणे आश्वासन दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांनीही १८ डिसेंबर २०१७ च्या संघटनेच्या मुंडन आक्रोश मोर्चात संघटनेच्या  शिष्टमंडळाला स्वतः पाचारण करून सदर DCPS/NPS धारक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांना म.ना.से.अधि. १९८२ व ८४ अंतर्गत कुटुंबनिवृत्तीवेतन योजनेचा तसेच सर्व कर्मचाऱ्यांना मृत्यू व सेवा निवृत्ती नंतर उपदानचा(गृज्युटी) लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही मंत्री महोदयांनी सदर लाभ देण्याच्या आश्वासनाची पूर्तता केली नाही उलट जुन्या पेन्शनच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे राज्यातील २००५ नंतरच्या लाखो कर्मचाऱ्यामधील असंतोष अधिक तीव्र झाल्याची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष किरण काळे यांनी दिली. 

या सर्व बाबींमुळे आमच्या संघटनेच्या वतीने  दि. २ ऑक्टोबर २०१८ गांधीजयंतीच्या पर्वावर महाराष्ट्रातील लाखो कर्मचारी शिवनेरी पासून मुंबई मंत्रालयावर पेंन्शनदिंडी  करणार आहेत व जुन्या पेन्शनच्या मागणीची पूर्तता न झाल्यास तिथेच मंत्रालयासमोर बेमुदत सामूहिक उपोषण करणार आहेत. या पेंशनदिंडी व सामूहिक उपोषणात आपल्या सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील लाखो कर्मचारी सहभागी होणार आहेत. म्हणून शासनाने त्वरित हा प्रश्न निकाली काढावा असा विनंती वजा इशारा  देण्यात आला.

यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ धांडोरे, कार्याध्यक्ष किरण काळे,  तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, कोषाध्यक्ष गणेश गोखले, आशपाक मुलाणी संदीप जाधव, अनुप जाधवर, सुनिल  कुटे उपस्थित होते.