Thu, Jun 27, 2019 09:52होमपेज › Solapur › मनपावर ‘उसने’ अधिकारी घेण्याची वेळ

मनपावर ‘उसने’ अधिकारी घेण्याची वेळ

Published On: Dec 01 2017 9:08AM | Last Updated: Nov 30 2017 10:01PM

बुकमार्क करा

सोलापूर : वेणुगोपाळ गाडी

गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अरिष्टात असलेल्या सोलापूर महापालिकेची अवस्था विचित्र झाली आहे. शासन मनपाला अधिकारी देत नसल्याने मनपाला अक्षरश: ‘उसने’ अधिकारी मागण्याची वेळ आली आहे. 

मनपाच्या आरोग्य खात्यासह परिवहन व इतर विभागांना शासनाकडून अधिकारी देण्याची जुनी मागणी आहे. मनपात अनेक अधिकारी-कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. याबाबत मनपाच्या पदाधिकारी तसेच प्रशासनाकडून शासन दरबारी पाठपुरावा केला जातो. मात्र काही महिन्यांपूर्वी शासनाकडून मनपाला नवीन अधिकारी देणे सोडाच आहे ते अधिकारी परत मागविण्यात आले. अशातच सोलापूर मनपाची ‘प्रतिमा’ राज्यभरात काहीशी नकारात्मक असल्याने अधिकारी येथे येण्यास राजी होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.  आरोग्य, परिवहन या विभागांना  अधिकारी नसल्याने या पदांचा प्रभार दुसर्‍या अधिकार्‍यांकडे सोपविण्यात येतो. या दोन्ही विभागांना अधिकारी मिळत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या विभागांचा कारभार ‘राम भरोसे’ चालत आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार अनेकदा चव्हाट्यावर आला. सर्वसामान्यांना मनपाच्या दवाखाने, हॉस्पिटलसंदर्भात अनुभव काही चांगला नाही. साथीच्या रोगांबाबतची ओरड तर नेहमीचीच आहे. केवळ नागरिकच नव्हे तर विरोधक, सत्ताधारी मंडळीदेखील आरोग्य विभागाच्या कारभारावर नाखुश आहेत, हे काही वेगळे सांगायची गरज नाही. परिवहनसंदर्भात अशीच बोंब आहे. या विभागाच्या समस्यांचा विषय म्हणजे ‘चावून चावून चोथा...’ अशी परिस्थिती आहे. सहायक आयुक्त अभिजित हराळे यांच्याकडे परिवहन व्यवस्थापकपदाचा प्रभार आहे. परिवहन उपक्रमाची अवस्था एवढी बिकट झाली आहे की विचारायची सोय नाही. अनेक महिन्यांचा पगार थकीत असल्याने कामगार संघटनेला नाईलाजास्तव न्यायालयात जायची वेळ आली आहे.

प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. जयंती आडके यांच्या निलंबनानंतर या पदाचा प्रभार जिल्हा आरोग्याधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला आहे. शासनाकडून अधिकारी दिले जात नसल्याने मनपाला सध्या ‘उसने’ अधिकारी मागण्याची वेळ आली आहे.  गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता  तसेच दोन मंत्री लाभूनदेखील मनपाचे प्रश्‍न सुटत नाहीत, हे वास्तव आहे.  त्यामुळे सोलापूर महापालिकेतील प्रशासनदेखील गतिमान होत नसल्याचे दिसून येत आहे.