Mon, Mar 25, 2019 04:54
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या 350 शाखा

अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या 350 शाखा

Published On: Mar 04 2018 1:38AM | Last Updated: Mar 03 2018 9:02PMपंढरपूर : प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोळरकर यांची हत्या ही व्यक्तीगत हत्या नव्हती तर त्यांचा विचार मारण्याचा प्रयत्न होता. मात्र त्यांच्या हत्येनंतर राज्यासह कर्नाटक, मध्य प्रदेशापासून राजस्थान, बिहार, पंजाबपर्यंत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कामाची व्याप्ती वाढली आहे. गेल्या 4 वर्षात अंनिसच्या शाखांची संख्या 200 वरून 350 पर्यंत वाढली आहे. दरम्यानच्या काळात जादुटोणा विरोधी आणि जात पंचायतविरोधी असे 2 कायदे  अंनिसच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाले आहेत.  गेल्या चार वर्षात 450 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल करण्याचे काम अंनिसच्या प्रबोधनातून झाल्याचे प्रतिपादन डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे सुपूत्र डॉ. हमीद दाभोळकर यांनी केले. येथे एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर  हमीद दाभोळकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य सीताराम गोसावी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना हमीद दाभोळकर म्हणाले की, साडे चार वर्षांपुर्वी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आणखी तीन समाजसुधारकांच्या हत्या झाल्या आहेत. गौरी लंकेश प्रकरणातील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. मात्र, दाभोळकर हत्या प्रकरणी न्यायालयानेच काही सुचना केल्याशिवाय तपासाला गती येत नाही.  
सरकार काँग्रेस आघाडीचे असो की भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे असो सर्व पक्ष सारखेच आहेत फक्त नावे वेगवेगळी आहेत. राजकारण आणि धर्मकारण वेगळे असणे गरजेचे आहे मात्र आपल्याकडे या दोन्ही व्यवस्था हातात हात घालून चालण्याची परंपरा आहे, असेही यावेळी दाभोळकर म्हणाले. 

अंधश्रद्धा निर्मुलन समिती केवळ हिंदू धर्मावरच टिका करते हा आरोप चुकीचा असून अंनिस जो जादुटोणा विरोधी कायदा करून घेतला तो मुस्लीम, ख्रिश्‍चन, बौद्ध धर्मासही लागू आहे. जादु टोणा विरोधी कायद्यानुसार पहिली कारवाई मुस्लीम धर्मीय भोंदू बाबाविरोधात झालेली आहे. आजवर मुस्लिम आणि ख्रिश्‍चन धर्मातील भोंदू बाबांचाही अंनिसच्या कार्यकर्त्यांना पर्दाफाश केला असल्याचे सांगून या देशात हिंदू बहुसंख्य आहेत, अन्य धर्मातील वाईट प्रथा परंपरांच्या विरोधात अंनिस पहिल्यापासूनच आहे. समान नागरी कायद्याचे समर्थन म्हणूनच अंनिस करीत आहे. संपूर्ण परिसर स्वच्छ करायचा असेल तर अगोदर आपले घर स्वच्छ करावे लागते, असे यावेळी दाभोळकर म्हणाले. 

अंधश्रद्धा निर्मुलन समिती ज्या दांभीकतेविरोधात, भोंदुगीरी विरोधात प्रबोधनाचे काम करीत आहे तेच काम संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वर, संत नामदेव, संत गाडेगे बाबांनी शेकडो वर्षांपासून केलेले आहे. म्हणून गेल्या काही वर्षांपासून अंनिस पंढरीच्या वारीत प्रबोधनाचे काम करीत आहे आणि वारकर्‍यांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.  
मुस्लीम धर्मीय महिलांसाठीच्या तीन तलाक विरोधी कायद्याचे समर्थन करून दाभोळकर म्हणाले की, या कायद्याचे राजकारण केले जात आहे. मुस्लीम महिलांना तीन तलाक म्हणून घटस्फोट दिल्यास आता गुन्हा होणार आहे. 

त्याचबरोबर हिंदू धर्मातही लग्न केल्यानंतर बायकांना सोडून दिले जाते. अशा परित्यक्त्या महिलांसाठीही कायदा करण्याची गरज आहे. केवळ मुस्लीमच नाही तर सर्वच धर्मातील स्त्रीयांचे शोषण थांबले पाहिजे अशी अंनिसची भुमिका असून त्यादृष्टीने अंनिस काम करीत असल्याचाही दावा हमीद दाभोळकर यांनी केला.