Tue, May 26, 2020 22:08होमपेज › Solapur › आता बेमुदत संप!

आता बेमुदत संप!

Published On: Sep 11 2019 2:31AM | Last Updated: Sep 10 2019 10:40PM
सोलापूर : प्रतिनिधी

जुनी पेन्शनसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीने 9 सप्टेंबर रोजी लाक्षणिक संप केला तर 11 सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला होता. दरम्यान, अर्थराज्यमंत्र्यांनी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला 11 सप्टेंबर रोजी चर्चेला  बोलविले असून या चर्चेत तोडगा न निघाल्यास 13 सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा समितीने दिला आहे.

जुनी पेन्शन योजना सुरू करावी, वेतन त्रुटी दूर कराव्यात, खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करून राज्यातील सर्व कार्यालयांत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करावे, सरळसेवा व पदोन्नतीतील मागासवर्गीयांचा अनुशेष तत्काळ भरला जावा, केंद्राप्रमाणे महिला कर्मचार्‍यांना प्रसूती, बालसंगोपन रजा व अन्य सवलती मिळाव्यात,  शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अनुकंपा भरती तत्काळ व विनाअट करावी,  केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत, लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान पदनाम, समान काम, समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावेत, आदी मागण्यांसाठी शासकीय कर्मचारी व शिक्षक आक्रमक झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विविध टप्प्यांत आंदोलने सुरू आहेत.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर समन्वय समितीने बेमुदत संप पुकारल्याने राज्य सरकार अडचणीत आले असून 9 सप्टेंबर रोजीचा लाक्षणिक संप यशस्वी केल्यानंतर समितीने 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपाची हाक दिली होती. दरम्यान, अर्थराज्यमंत्र्यांनी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला 11 सप्टेंबर रोजीच चर्चेस बोलविले आहे. या चर्चेत सरकारकडून कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. मागण्या मान्य न झाल्यास 13 सप्टेंबरपासून बेमुदत बंदचा इशारा समितीने दिला असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश पदाधिकारी शंतनू गायकवाड यांनी कळविले आहे.