होमपेज › Solapur › जिल्हा परिषदेच्या सात दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांना प्रशासनाच्या नोटिसा

जिल्हा परिषदेच्या सात दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांना प्रशासनाच्या नोटिसा

Published On: Mar 07 2018 11:19PM | Last Updated: Mar 07 2018 10:59PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत उघडकीस आलेल्या लाचखोरीच्या घटनेनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी जिल्हा परिषदेत पुन्हा कडक भूमिका घेतली आहे. बुधवारी सकाळी कार्यालयीन वेळेत हजर नसलेल्या 7 कर्मचार्‍यांना नोटिसा देण्याची कारवाई यावेळी करण्यात आली. कार्यालयीन वेळेत कर्मचारी कार्यालयाच्या बाहेर दिसून आल्यावर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. 

लाचखोरीच्या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या कारभारावर टीका होत असल्याने डॉ. भारूड यांच्याकडून पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या यंत्रणेत शिस्त आणण्याचा प्रयत्न होत आहे. बुधवारी डॉ. भारूड यांनी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी अचानक सर्व खातेप्रमुखांकडून हजेरी पत्रक मागवून घेतले. यावेळी 7 कर्मचार्‍यांची दांडी दिसून आल्याने त्यांना नोटीस देण्याची कारवाई यावेळी करण्यात आली. 
जिल्हा परिषदेत एकूण 416 कर्मचारी हजेरीपत्रकावर आहेत. यापैकी 340 कर्मचार्‍यांची उपस्थिती वेळेत दिसून आली. 22 कर्मचारी रजेवर होते, तर 47 कर्मचारी हे शासकीय कार्यालयाच्या निमित्ताने फिरतीवर व प्रशिक्षणासाठी होते. 

यावेळी आरोग्य विभागातील 2, स्वच्छ भारत मिशन अभियान कक्षातील 3, तर लघुपाटबंधारे विभागातील 2 कर्मचार्‍यांची दांडी दिसून आली. या कर्मचार्‍यांना तातडीने नोटिसा काढण्याचे आदेश डॉ. भारुड यांनी खातेप्रमुखांना दिले.