Mon, Sep 24, 2018 14:58होमपेज › Solapur › वांझोट्या ढगामुळे कृत्रिम पावसाची संकल्पनाही बारगळली  

वांझोट्या ढगामुळे कृत्रिम पावसाची संकल्पनाही बारगळली  

Published On: Jul 16 2018 1:20AM | Last Updated: Jul 15 2018 10:25PMसोलापूर : महेश पांढरे 

पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटले तरी सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर तुरळक पाऊस आणि वांझोट्या ढगांमुळे जिल्ह्यातील कृत्रिम पावसाची संकल्पना ही बारगळली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्राने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे यंदा पावसाळा चांगला असून खरिपाला वरदान असल्याचे दिसून येत होते. मात्र मृगानंतर आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्रामध्ये म्हणावा तसा पाऊस सोलापूर जिल्ह्यात झाला नाही. त्यामुळे खरिपाला पोषक वातावरण निर्माण झाले नाही. सुरुवातीला मशागती झालेल्या शेतकर्‍यांनी मृग नक्षत्रानंतर खरीप पेरण्याला सुरुवात केली. मात्र काही दिवसांतच पावसाने दडी मारली, त्यामुळे पुढच्या पेरण्या वाया जातील, या भीतीने खरिपाच्या पेरण्या थांबविण्याची वेळ आली, तर दुसरीकडे आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्र पूर्णपणे वाया गेल्याने गेल्या महिनाभरात सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याच भागात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी खरीप पेरणीची संपूर्ण तयारी केली असली तरी पेरण्या होऊ शकल्या नाहीत. 

खरिपासाठी बियाणे, खतांच्या खरेदीबरोबर मशागतीची कामे युध्द पातळीवर सुरू होती. मात्र पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील बळीराजा सध्या हतबल झाला आहे. तर गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात केवळ 26 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आणखी काही दिवसांत जर पावसाने म्हणावी तशी हजेरी नाही लावली तर सोलापूर जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे प्रशासकीय पातळीवरून सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. त्यासाठीची यंत्रणा नागपूर येथे सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली होती.त्यासाठी चाचपणीही करण्यात येणार होती. मात्र सोलापूर जिल्ह्यात येणारे ढग हे कृत्रिम पावसासाठी योग्य नसल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्‍त केले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोगही बारगळला आहे. त्यामुळे बळीराजाच्यासाठी आता मेघराजाने प्रसन्न झाल्याशिवाय पर्याय उरला नाही.