Tue, Jul 23, 2019 01:56होमपेज › Solapur › सत्ताधारी आणि विरोधकांत विसंवाद

शहाणपण दे रे देवा!

Published On: Feb 21 2018 1:19AM | Last Updated: Feb 20 2018 10:25PMपंढरपूर : नवनाथ पोरे

सत्ताधार्‍यांकडे पाशवी बहुमत आणि संख्येने कमी असले तरी अभ्यासू, अनुभवी विरोधी नगरसेवक यांच्यातील खडाजंगीमुळे गेल्या वर्षभरातील चारही सर्वसाधारण सभा गोंधळात गुंडाळाव्या लागल्या आहेत. यामुळे सभागृहात विषयपत्रिकेवरील कामकाज होत नाही. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून कामकाज गुंडाळून टाकतात आणि प्रशासकीय अधिकारी वादविवादात सुखरूप निसटून जातात. परिणामी शहारातील  प्रश्‍न जसेच्या तसेच आहेत. प्रशासकीय यंत्रणा सत्ताधारी, विरोधकांच्या या  विसंवादाचा फायदा घेऊन सुस्तावल्याचे दिसून येत आहे. 

नगरपालिकेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा  मंगळवारी गोंधळाची परंपरा सांभाळून झाली. जेमतेम 30 मिनिटांत वर्षभराचे अंदाजपत्रक सत्ताधार्‍यांनी बहुमताच्या आवाजी जोरावर मंजूर करून टाकले. त्याचे सभागृहात वाचनही झालेले नाही. त्यावर कसलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे या अंदाजपत्रकात जे काही सत्ताधार्‍यांनी ठेवले आहे ते स्वीकारण्याशिवाय पंढरपूरकरांपुढे पर्याय नाही. 

2016 वर्षाअखेर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. जनतेतून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत साधना भोसले या विजयी झाल्या. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडी, भारतीय जनता पक्ष यांच्या आघाडीला काही अपक्षांनीही पाठिंबा दिला. यामुळे सत्ताधार्‍यांच्या बाजूला बहुमताचा आकडा 25 पेक्षाही जास्त झाला आहे. विरोधी तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि काँग्रेसच्या हाताशी जेमतेम 8 नगरसेवकांचे बळ आहे. मात्र या आठजणांपैकी 4 ते 5 नगरसेवक अनुभवी, अभ्यासू आहेत. त्यामुळे सभागृहात संख्येने जास्त असलेल्या सत्ताधार्‍यांना प्रबळ विरोधकाप्रमाणे सामना करावा लागतो आहे. वर्षभरात जेमतेम 4 सर्वसाधारण सभा झालेल्या आहेत आणि  त्या चारही सभा या शाब्दिक खडाजंगीनंतर गुंडाळून टाकाव्या लागल्या आहेत. सत्ताधार्‍यांना सभा गुंडाळून विषय मंजूर करून घेण्यात यश येत असले तरी ही सभागृह चालवण्याची योग्य पद्धत नाही. विरोधकांनी किती ताणायचे याचे तारतम्य बाळगणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे सत्ताधार्‍यांनीही बहुमताच्या जोरावर सभागृह ओढून नेत असताना जनहिताची, शहराच्या विकासाची फरपट होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. विरोधकांचा आवाज दुबळा आहे म्हणून दामटून नेण्याची पद्धत दांडगाईत मोडणारी आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही सदस्य जनतेने निवडून दिलेले आहेत. त्यांची तळमळ नक्कीच जनहिताची आहे. मात्र यांच्यातील विसंवादाचा, हेव्या-दाव्याचा गैरफायदा प्रशासन उचलताना दिसून येत आहे. प्रशासन आणि एकूणच व्यवस्थेत असलेल्या अपप्रवृत्ती या विसंवादाचा गैरफायदा उचलून नामानिराळे राहात आहेत. विरोधकांच्या मागण्या काय आहेत, त्यांचे आक्षेप काय आहेत याचा विचार करून त्यासंदर्भात अधिकार्‍यांकडून सुसंगत उत्तरे घेणे, त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे काम सत्ताधारी गटाचे आहे. परंतु  सभागृहात तसे होताना दिसत नाही. त्यामुळे शहराचे आरोग्य दरदिवशी खालावत चालले आहे. सभागृहात शासकीय योजना, खर्चित निधीची उपयुक्‍तता कधी तरी चर्चेचा विषय व्हायला हवी. मात्र तसे न होता सत्ताधार्‍यांना विरोध करायचा म्हणून विरोधक ताणून धरतात आणि विरोधकांची जिरवायची म्हणून सत्ताधारी कामकाज चालवत आहेत. सत्ताधारी, विरोधक यांच्यामध्ये समन्वय, ताळमेळ असला आणि दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा सभागृहात  झाली तरी प्रशासनाला नीटनेटकेपणाने वागावे लागेल आणि शहराच्या प्रश्‍नांचीही प्रामाणिकपणे सोडवणूकही करावी लागेल. मात्र यासंदर्भात सत्ताधारी आणि विरोधकांना सुबुद्धी कधी सूचणार, हे येणारा काळच सांगू शकणार आहे.