Fri, Apr 26, 2019 18:01होमपेज › Solapur › सोलापूर : मोहोळमध्ये बंद नाही; सर्व व्यवहार सुरळीत 

सोलापूर : मोहोळमध्ये बंद नाही; सर्व व्यवहार सुरळीत 

Published On: Jul 24 2018 2:27PM | Last Updated: Jul 24 2018 2:27PMमोहोळ ; वार्ताहर

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील मराठा संघटनांनी अघोषित महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र मोहोळ शहरवासीयांनी या बंद मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेत सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु ठेवले. मोहोळ शहरातील व्यापारी, सामाजिक, राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी २४ जुलै रोजी मोहोळ बंद न ठेऊन संपुर्ण महाराष्ट्राला आदर्श घालून दिला आहे.

गेल्या वर्षी विविध जातीधर्माच्या महापुरुषांची सोशल मिडीयावर विटंबना करण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे तणाव वाढून मोहोळ शहर अनेक वेळा बंद ठेवण्यात आले होते. यामुळे व्यापाऱ्यासह सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. त्यामुळे मोहोळ शहरातील व्यापारी आणि राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कोणताही मुद्दा असला तरी मोहोळ बंद न ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता.

मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. मात्र मराठा क्रांती मोर्चा आणि सखल मराठा समाज मोहोळ शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी मोहोळ शहर बंद न ठेवण्या बाबतच्या सुचना सोशल मिडीयावरुन सर्वांना दिल्या. तसेच मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या साठी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सध्या आषाढी वारी सुरु असून पंढरपूरला आलेले लाखो वारकरी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून मराठा क्रांती मोर्चाने घेतलेल्या भुमिकेचे सर्वच क्षेत्रातून स्वागत होत आहे.

सर्वसामान्य जनतेला वेठीस न धरता लोकशाही मार्गाने मागण्या मांडण्याऱ्या मोहोळरांनी संपूर्ण महाराष्ट्रा समोर एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. शहरातील मराठा संघटनांच्या भुमिकेमुळे सामाजिक ऐक्य मजबुत होण्यास मोठी मदत मिळणार आहे.